पर्यटन विकास महामंडळाच्या नावे उमेदवारांची फसवणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:44+5:302021-06-03T04:22:44+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे लेटर हेडचा व शिक्के बनावट तयार करून अज्ञात व्यक्ती बेरोजगारांना नियुक्तीपत्रे देत ...
रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे लेटर हेडचा व शिक्के बनावट तयार करून अज्ञात व्यक्ती बेरोजगारांना नियुक्तीपत्रे देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामंडळाच्या कोकण विभागाकडून अशी कोणत्याही पद्धतीची नोकरभरती जाहिरात प्रसिद्ध झाली नसून कोणत्याही उमेदवारांची नियुक्तीदेखील करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बनावट लेटर हेड व शिक्के तयार करून अज्ञात व्यक्ती त्याचा गैरवापर करून काही उमेदवारांना नोकरी बाबतची नियुक्तिपत्रे देत असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. ही व्यक्ती गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस नियुक्ती पत्राआधारे गरजू उमेदवारांची आर्थिक व मानसिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभाग यांचेमार्फत कोणत्याही पद्धतीची नोकरभरती जाहिरात प्रसिध्द केली नाही व कोणत्याही उमेदवारांची नियुक्तीदेखील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभागाने केली नाही, असे स्पष्ट केले आहे.
अशा बोगस नियुक्तिपत्रांना व जाहिरांतींना बळी पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल त्यांनी संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करावी व याबाबत काही आवश्यक माहिती हवी असल्यास प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी कोकण विभाग, जिल्हधिकारी कार्यालय आवार, ए विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी दीपक माने (कोकण विभाग) यांनी केले आहे.