गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:27 PM2024-10-02T16:27:31+5:302024-10-02T16:28:04+5:30
..तर रामदास कदमांचा गैरसमज दूर झाला असता
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातून शिवसैनिकच विधानसभेची निवडणूक लढवेल. या मतदारसंघासाठी अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याने फलक लावला, म्हणजे त्यांनाच उमेदवारी दिली, असे होत नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी येथील प्रांत कार्यालयाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर शिक्षक बँकेतील आयोजित कार्यक्रमात बचत गटाच्या सीआरपींना मोबाइलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, गुहागर विधानसभा मतदारसंघाबाबत आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकांनी फलक लावला, म्हणजे त्यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळेल, असे होत नाही. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
जिल्ह्यातील ५ प्रांत कार्यालयांना प्रत्येकी ५ कोटींप्रमाणे जिल्हा नियोजनमधून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर केलेला आहे. प्रांत कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्याने तेथे नवीन प्रशस्त इमारती नजीकच्या काळात उभ्या राहतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांनाही नवीन वाहने दिली आहेत, चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी शासनाने १५५ कोटींचा निधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
'..त्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये वाढ होत राहील'
खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर मंत्री सामंत म्हणाले की, राऊत हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. त्यांच्या टीकेमुळे महायुतीच्या मतांमध्ये आणखी वाढ होत राहील. सामान्य जनताही त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिलांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
आधी मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे होते
शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागरमधील उमेदवारीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. या चर्चेतून त्यांचा गैरसमज दूर झाला असता, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.