दोन जिवंत काडतुसांसह रोख ऐवजही हस्तगत
By admin | Published: July 16, 2014 11:22 PM2014-07-16T23:22:34+5:302014-07-16T23:22:54+5:30
रत्नागिरीतील घटना :
रत्नागिरी : परदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रिक्षाचालकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. परवेज इरफान सय्यद (वय ४४, रा. नाईकनगर, महालक्ष्मी मंदिरासमोर, खेडशी, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडील एक लाख रुपये कि मतीच्या पिस्तुलासह एक लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सय्यद याने हे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले; परंतु कोणास विक्री करणार याबाबत मात्र त्याने मौन पाळले आहे. सय्यद शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.
एक रिक्षा शहरातील आठवडा बाजार येथील संगीता लॉजसमोर संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्या रिक्षावाल्यास थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अमेरिकन बनावटीचे एक लाख रुपये किमतीचे पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्या ताब्यातील रिक्षासह (एमएच ०८ इ ६२५१) सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला. सय्यदवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. (प्रतिनिधी)
पिस्तूल आणले बिहारमधून ?
रत्नागिरीत काहीजण उत्तर प्रदेश व बिहारमधून बेकायदा पिस्तुलासारखी शस्त्रे विक्रीसाठी आणत असून, अशी पिस्तुले कोणी खरेदी केली आहेत का, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. सय्यदकडे मिळालेले पिस्तूलही बिहारमधून आणले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
‘गेम’ करण्याचा बेत?
सय्यद याच्याकडे केवळ पिस्तूलच नव्हे, तर त्याच्याकडे जिवंत काडतुसेही सापडली आहेत. त्यामुळे तो कोणाच्या सांगण्यावरून ‘गेम’ करण्यासाठी, तर आला नाही ना, असा संशयही व्यक्त होत आहे. पोलीस सर्व स्तरांवर याप्रकरणी तपास करीत आहेत.