लांजावासियांचा तब्बल तीन तास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:35 PM2018-10-12T17:35:46+5:302018-10-12T17:37:06+5:30
महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांनी महावितरणच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला.
लांजा : महावितरण लांजा सारख्या कार्यालयात अधिकारी नाहीत त्यातच प्रभारी अधिकारी समर्पक उत्तरे देत नसतील तर नागरिकांची कामे वेळेत कशी होणार, असा संतप्त सवाल करून अशा रिकाम्या खुर्च्या दिसल्या तर बाहेर फेकून देऊ, असा सज्जड इशारा लांजा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांनी महावितरणच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला.
लांजा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात तालुक्यातील नागरिकांनी लांजा महावितरण कार्यालयावर धडक देऊन प्रभारी अधिकारी सरदेसाई यांना तब्बल तीन तास घेराओ घालून चांगलेच धारेवर धरले.
यावेळी तालुक्यातील विवली, बेनी खुर्द, खेरवसे या ठिकाणी तब्बल आठ ते दहा दिवस वीज नसल्याने संतप्त झालेले ग्रामस्थ आणि लांजा शहरात सातत्याने वीज जाण्याचे प्रकार, गंजलेले पोल, आणि महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे अवास्तव आलेली विद्युत बिले, नवीन मीटर उपलब्ध नसल्याने विद्युत कनेक्शन देण्यासाठी होणार उशीर अशा सर्व समस्यांविरोधात नागरिक धडकले होते.
महावितरणच्या लांजा कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारीच नाहीत जे होते त्यातील बरेचजण प्रभारी कामकाज सांभाळत होते. याबाबत विचारले असता हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याठिकाणी येणारा माणूस ज्या अधिकाऱ्यांकडे समस्या मांडतो. तो पुन्हा त्या कार्यालयात दिसत नाही. त्यामुळे समस्या तशाच राहतात.
विवली गावात आणि खेरवसे गावात ट्रान्सफार्मर नसल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. तो चौवीस तासाच्या आत बसला पाहिजे आणि विद्युत पुरवठा सुरळीत झाला पाहिजे या मागणीवर उपस्थित ठाम राहिले. अखेर अधिकाऱ्यांनी रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधून दोन ट्रान्सफार्मरची व्यवस्था केली. सायंकाळपर्यंत आणले जातील याची हमी दिली.