साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक ठार; नवरदेवासह सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:08 PM2022-04-22T12:08:54+5:302022-04-22T15:38:05+5:30
दापोली : साखरपुड्यासाठी नवरदेवासह कुटुंबिय नवरीच्या गावी निघाले असता, घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात एक ठार तर नवरदेवासह सहा ...
दापोली : साखरपुड्यासाठी नवरदेवासह कुटुंबिय नवरीच्या गावी निघाले असता, घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात एक ठार तर नवरदेवासह सहा जण जखमी झाले. दीपक कदम (वय-५५, पालवणी, सध्या रा. मुंबई) असे मृताचे नाव आहे. जखमीमधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. कुंभवे मराठी शाळेजवळ गतिरोधकावर आदळल्याने कारचा अपघात झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभवे शिगवण वाडीतील तुषार डिके यांचे लग्न मंडणगड तालुक्यातील पालवणी गावातील मुलीशी ठरले होते. आज, त्यांचा साखरपुडा होता. तर २४ तारखेला लग्न होते. या साखरपुड्यासाठी तुषारचे मित्र गाडी घेऊन मुंबईतून आले होते. दीपक कदम यांची फॅमिली आजच मुंबईतून कुंभवे येथे दाखल झाले होते.
ही सर्व मंडळी एकत्रितपणे साखरपुड्यासाठी मंडणगड तालुक्यातील पालवणी गावाला जायला निघाली होती. कारमध्ये नवरदेवा सह इतर नातेवाईक मंडळी बसली होती. परंतू घरापासून अवघ्या दोनशे मीटरवर अपघात होऊन सर्वावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नवरदेवच कार चालवत असल्याची चर्चा
नवरदेव तुषार डिके हाच कार चालवत असल्याची चर्चा असून या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसली असल्याची चर्चा होती. गावातील स्पीड ब्रेकरवर गाडी आदळल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. अपघाताचा मोठा आवाज झाला आणि आजूबाजूचे शेजारी धावून आले.