रत्नागिरी: आगवे पुलावरून कार ४० फूट नाल्यात कोसळली, तिघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:40 PM2022-09-30T18:40:45+5:302022-09-30T18:41:03+5:30
महामार्गाचा काही भाग खचलेला असल्याने पोळ यांचा कारचा ताबा सुटला.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील आगवे येथे पुलावरून ४० फूट खोल नाल्यात कार कोसळून तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात जिल्हा रुग्णालयातील पती-पत्नी डॉक्टरांसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. आनंद चंद्रशेखर पोळ, डॉ. समीक्षा आनंद पोळ (रा. दोघेही रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांच्या शिबिरासाठी डॉक्टर दाम्पत्य रत्नागिरीहून चिपळूकडे येत होते. सावर्डेपासून काही अंतरावर आगवे पुलानजीक महामार्गाचा काही भाग खचलेला असल्याने पोळ यांचा कारचा ताबा सुटला. त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक बसली. त्यानंतर ही कार रस्ता सोडून नजीकच्या ४० फूट खोल नाल्यात कोसळली.
या अपघातात डॉ. समीक्षा पोळ व डॉ. आनंद पोळ हे जबर जखमी झाले. त्यांना तत्काळ बाहेर काढून नजीकच्या डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीस्वारही गंभीर जखमी असून, त्याच्यावरही या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनस्थळी पोहोचले होते.
या अपघातानंतर तत्काळ घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटस उभारून तो परिसर सील करण्यात आला. तेथे एकेरी वाहतूक ठेवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. सावर्डे ते कामथे दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, काँक्रिटीकरणालाही तडे गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी घटनास्थळी करण्यात आली.