आई तब्येत सांभाळ, मुलांची काळजी घे..!
By admin | Published: May 22, 2016 11:05 PM2016-05-22T23:05:49+5:302016-05-23T00:19:07+5:30
पत्नीची आर्त किंकाळी : पांडुरंगने शनिवारी सकाळी केला होता फोन
महादेव भिसे ल्ल आंबोली --आई, तब्येत सांभाळ. माझ्या मुलांची काळजी घे. मी बरा आहे, असे सांगणारा शेवटचा फोन पाडुरंग गावडे यांनी शनिवारी सकाळी केला होता. पांडुरंग यांचा तोच फोन घरच्यांसाठी शेवटचा ठरला. पांडुरंग यांच्या अनेक आठवणी सांगत गावडे कुटंबियांनी केलेला आक्रोश मनाला वेदना देणारा होता. अनेक जण गावडे कुटुंबियांचे सांत्वन करीत होते. त्यांनाही हुंदके आवरता येणे शक्य नव्हते. पतीच्या निधनाची बातमी ऐकून पत्नीने मारलेली आर्त किंकाळी अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारीच ठरत होती.
श्रीनगर- कुपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेला पांडुरंग गावडे हा जवान कोंबिग आॅपरेशनसाठी पहिल्या तुकडीत कार्यरत होता. गेले तीन दिवस कुपवाडा येथील चकड्रगमुल्ला या गावी एका घरात पाच आतंकवादी लपून बसले होते. त्यांना शोधून काढत असताना बहाद्दर जवान त्या घरापर्यंत पोहोचले. यावेळी अतिरेक्यांनी घरामधून केलेल्या गोळीबारातील एक गोळी जवान पांडुरंग यांच्या डोक्याला लागली. त्यांना तातडीने श्रीनगर येथील सैन्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांचे निधन झाले. निधनाचे वृत्त रविवारी सकाळी त्यांच्या मूळगावी आंबोलीला येऊन थडकताच गावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता.
आपल्या मुलाने काल मला खुशालीचा फोन केला आणि असे काय घडले, असा सवाल अधून-मधून गावडे कुटुंब विचारत होते. पांडुरंग हे महिन्यापूर्वी आपल्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी आपला मोठा मुलगा प्रज्वल याचा वाढदिवस साजरा केला होता. तर चार महिन्याचा वेदांत याचा नामकरण सोहळा साजरा केला होता. या आठवणींनी गावडे कुटुंबियांना हुंदका आवरता येत नव्हता. या एका महिन्याच्या काळात पांडुरंग याने अनेक आठवणी कुटुंबियांना सांगितल्या होत्या. त्याची स्वप्ने मोठी होती. नेहमी देशसेवेसाठी लढण्याची त्यांची इच्छा होती.
पांडुरंग यांचे १२ वीपर्यतचे शिक्षण आंबोलीतील युनियन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला आणि ते २००१ मध्ये सैन्यात भरती झाले. सुट्टीच्या काळात अधून-मधून घरी येत असत. २०१० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे संपूर्ण कुटूंब आंबोलीतच वास्तव्यास आहे. पांडुरंग गावडे यांचे वडील महादेव गावडे शेतकरी कुटुंबातील असले, तरी त्यांची तिन्ही मुले देशसेवेसाठी भारतीय सैन्यात होती.
त्यातील गणपत गावडे हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तर अशोक गावडे हे अद्यापही सैन्यात देशसेवा बजावत आहेत. त्यामुळे गावडे कुटुंबियांना देशसेवेची आवड असल्याचे त्यांच्या भाषेतून जाणवत होते. मात्र, पांडुुरंग यांच्या अचानक निधनाच्या बातमीने गावडे कुटुंबीय हेलावून गेले आहेत. पांडुरंग यांच्या आठवणीनी अनेक प्रसंग सांगताना त्यांच्या बंधूंचे डोळे दाटून येत होते.
सह्याद्रीचा बाणा अतिरेक्यांना शोधण्यास पहिला धावला
श्रीनगर-कुपवाडा येथील चकड्रगमुल्ला या गावातील एका घरात पाच अतिरेकी लपल्याची माहिती जेव्हा भारतीय सैन्याला कळाली, तेव्हा त्या गावात कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. त्यावेळी सह्याद्रीचा बाणा असलेला आंबोलीचा शूरवीर जवान पांडुरंग गावडे हा प्रथम तुकडीसह त्या ठिकाणी गेला. त्यावेळी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पांडुरंग जखमी झाले आणि नंतर ते शहीद झाले. पण सह्याद्रीचा बाणा त्यांनी कायम राखला. त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या मित्रांनी सांगितल्या.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान पांडुरंग गावडे यांचे पार्थिव सोमवारी आंबोलीत पोहोचणार असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महिनाभरापूर्वीच शहीद पांडुरंग गावडे गावी आले असता त्यांनी मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर छोट्याचा नामकरण सोहळा साजरा केला.