जिल्ह्यात काेराेना वाढतोय, सॅनिटायझरचा वापर घटतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:31 AM2021-03-17T04:31:52+5:302021-03-17T04:31:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर बेफिकीरी दाखविली जात आहे. सध्या मास्क आणि सॅनिटायझरचा वापरच कमी झाल्याने त्यांच्या विक्रीतही गतवर्षीपेक्षा घट झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने तसेच संचारबंदीच्या अनुषंंगाने कडक नियम करण्यात आल्याने सॅनिटायझर आणि मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर होत हाेता.
ऑक्टोबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे कोरोना गेला, असे समजून नागरिकांचा विना मास्क वावर वाढला तसेच सॅनिटायझरचाही वापर कमी झाला. त्यामुळे औषधांच्या दुकानातील मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटली आहे.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येत आहे.
लोक मास्क वापरतात. पण तो नाकावरच लावतात आणि समोर कोण बोलायला आले तर चेहरा न झाकता उलट मास्क खाली करून बोलतात. हे जास्त संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचाही वापर आता फारसा करताना दिसत नाहीत.
- उन्मेष शिंदे, अध्यक्ष
केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रत्नागिरी
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
काही वेळा मास्कचा वापर केल्यावर घुसमटल्यासारखे वाटते. त्यामुळे नेहमी मास्क वापरला जात नाही. तसेच सॅनिटायझरऐवजी वारंवार हात धुतले जातात. त्यामुळे अपाय होत नाही. सध्या आम्ही सॅनिटायझर पूर्णपणे बंद केले असून हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो.
- चेतन केंद्रे, रत्नागिरी
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क हे कोरोनापासून वाचविणारे उत्तम शस्त्र आहे. त्याचबरोबर प्रवास करताना किंवा बाहेर वावरताना सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. घरात असताना सॅनिटायझरऐवजी पाण्याचा वापर केल्यास सॅनिटायझरचे दुष्परिणाम होणार नाहीत.
- रेखा सावंत, रत्नागिरी
मास्क, सॅनिटायझर विक्री घटली
सध्या लोकांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाल्याचे मारूती मंदिर येथील औषध विक्रेत्याने सांगितले.
मास्क आता सगळेच औषध दुकानातून नेतात असे नाही. आता घरगुती अनेक व्यक्ती मास्क विकतात. त्यामुळे मास्कच्या दुकानातील विक्रीत घट झाल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितले.
मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाली असल्याचे आरोग्य मंदिर येथील एका औषध विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
कोरोनाचे प्रमाण कमी होताच लोकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे कमी केले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी विक्री ५० टक्के घटली असल्याचे मारूती मंदिर येथील एका औषध विक्रेत्याने सांगितले.