काेरोनाच्या भीतीने भावकीत आलेय अंतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:08+5:302021-05-21T04:33:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब तसेच त्यांच्या भावकीतील लोकही पुढे येत नाहीत. त्यामुळे गावातील ग्रामसेवकच अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत आहेत़ तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथेही असाच प्रकार घडला. बाधित व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी कोणीही आले नाही. अखेर ग्रामसेवकाने पुढाकार घेतल्यावर चौघेजण तयार झाले आणि अंत्यविधी पार पडला. अशा घटनांमुळे भावकी - भावकीत अंतर निर्माण झाल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत आहे.
काेराेनाच्या काळात ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेला काम करताना तितक्याच अडचणींना सामाेरे जावे लागते आहे. विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर या अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारला जात नाही किंवा त्यावर अंत्यविधी करण्यासाठी मृत व्यक्तीची भावकी, नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थ पुढाकार घेत नसल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येऊ लागले आहेत. तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथे एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना व ग्रामस्थांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर मृताचा भाऊ व भावकीतील एक सदस्य पुढे आले. ग्रामकृती दलातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली. रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत मृतास नेण्यासाठी चार व्यक्ती उपस्थित नव्हत्या. शेवटी ग्रामसेवक मनोहर शंकर गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेतल्यावर रुग्णवाहिकेचे चालकही तयार झाले. सर्वांनी पीपीई कीट घालून मृतास स्मशानशेडपर्यंत नेले. तिथे अंत्यसंस्कार झाल्यावर सर्वजण परतले. ग्रामसेवक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अशापद्धतीने पाच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.
काही ठिकाणी ग्रामकृतीदलही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. कोरोना कालावधीत भीतीपोटी भावकीत वाढलेले अंतर कमी करण्यासाठी ग्रामकृती दलातून प्रयत्न होण्याची गरज आहे.
----------------------------
कोरोनाबाधित मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता पीपीई कीट व अन्य यंत्रणा ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्यास अडचणी येणार नाही. गावा-गावांमधून अशाच पद्धतीने अंत्यविधी पार पडत आहेत. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीवर अवलंबून राहता त्या-त्या गावांतील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी भावकी, ग्रामकृतीदलाने पुढे येण्याची गरज आहे. प्रशासनावर अधिक भार टाकणे योग्य नाही.
- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण पंचायत समिती