कापरे आरोग्य केंद्रांतर्गत घराेघरी जाऊन काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:26+5:302021-06-05T04:23:26+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कापरेअंतर्गत येणाऱ्या गावात जाऊन लोकांची कोरोना चाचणी केली. त्यामुळे लोकांचा वेळ व ...
अडरे : चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कापरेअंतर्गत येणाऱ्या गावात जाऊन लोकांची कोरोना चाचणी केली. त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक खर्च वाचला.
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. संबंधीत लोकांना आरोग्य केंद्रात यावे लागते. यासाठी वाहनांची आवश्यकता असून, वेळही वाया जाताे. या गोष्टीचा विचार करून कापरे आरोग्य केंद्र व्यवस्थापनाने घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य केंद्रातील आरोग्य पथकाद्वारे व्यक्ती आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येण्याची वाट न बघता गावात जाऊन त्यांच्या घरातच चाचणी केल्या जात आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रात अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांची काेराेनाची चाचणी करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे काेराेना आजाराचे लवकर निदान हाेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार हाेण्यास मदत हाेत आहे.