चिपळुणातील आमनेसामने प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:34 AM2021-08-26T04:34:03+5:302021-08-26T04:34:03+5:30
चिपळूण : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळुणात आल्यानंतर शिवसेना व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले. यातून एकमेकांविरोधात प्रचंड ...
चिपळूण : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळुणात आल्यानंतर शिवसेना व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले. यातून एकमेकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकारही घडले. त्यातून काही काळ मुंबई-गोवा आणि गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. एवढे सारे झाले, तरी या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जनआशीर्वाद यात्रेत त्याचे पडसाद उमटले. त्यानुसार, जनआशीर्वाद यात्रा चिपळुणात येताच, शिवसैनिकांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. शहरातील बहादूरशेख नाका आणि हॉटेल अतिथीसमोर झालेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने भाजप आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले होते. यातून बहादूरशेख नाका, तसेच हॉटेल अतिथीसमोर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक रखडल्याने बायपास मार्गे ती वळविण्यात आली. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा ही दिवसभर कामी लागली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग तेथेच उपस्थित होते. मात्र, कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
मुळात कोरोना काळात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. केवळ मास्क न वापरल्यानेही दाखल झाले आहेत. मात्र, या राडा प्रकरणात शेकडो कार्यकर्ते जमाव करून रस्त्यावर उतरले होते, तसेच महामार्गावरील वाहतूक ही बराच वेळ ठप्प झाली होती. असे असताना बुधवारी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
कोट
जन आशीर्वाद यात्रेतील घटनेप्रकरणी अद्याप कोणाचीही तक्रार झालेली नाही. तक्रार झाल्यास त्याची दखल घेतली जाईल. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद झाली होती, परंतु दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
बाळकृष्ण जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक, चिपळूण.
फोटो-
शिवसेना व भाजपतील कार्यकर्ते आमने सामने आल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.