Ratnagiri: वायू गळतीप्रकरणी जिंदल कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:00 IST2024-12-14T11:59:45+5:302024-12-14T12:00:07+5:30
रत्नागिरी : जिंदल कंपनीमधून वायुगळतीमुळे ६८ मुले आणि मुली जिल्हा शासकीय रुग्णालय व परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये ...

Ratnagiri: वायू गळतीप्रकरणी जिंदल कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : जिंदल कंपनीमधून वायुगळतीमुळे ६८ मुले आणि मुली जिल्हा शासकीय रुग्णालय व परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार जिंदल कंपनीच्या चाैघांवर शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश आमदार उदय सामंत यांनी सकाळी महसूल व पाेलिस प्रशासनाला दिले हाेते. गंगाधर बंडाेपाध्याय, भावीन पटेल, सिद्धार्थ काेरे, दीप विटलानी (सर्व रा. जेएसडब्ल्यू कंपनी, रत्नागिरी) अशी गुन्हा नोंद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी जयगड येथील वायुगळतीमुळे उपचार घेत असलेल्या बाधित मुला-मुलींची जिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगितले.
कंपनीच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या हाेत्या. त्यानंतर सायंकाळी रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जयगड पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार गंगाधर बंडाेपाध्याय, भावीन पटेल, सिद्धार्थ काेरे, दीप विटलानी (सर्व रा. जेएसडब्ल्यू कंपनी, रत्नागिरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
निष्काळजीपणाचा ठपका
कंपनीच्या पाेर्ट विभागातील एलपीजी गॅस प्लांटच्या देखभालीचे काम गंगाधर बंडाेपाध्याय व भावीन पटेल यांच्या निगराणीखाली सुरू हाेते. यावेळी सिद्धार्थ काेरे आणि दीप विटलानी हे प्लांटचे शिल्लक असलेल्या गॅससंबंधी काम करत असताना याेग्य ती काळजी घेतलेली नाही. त्यामुळे गॅस त्यांच्या निष्काळजीपणाने हवेत पसरून विद्यार्थ्यांच्या शरीरात गेला. त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचा ठपका चाैघांवर ठेवण्यात आला आहे.