‘कॅस्पर’च्या मृत्यूने लावला चटका, मालकाच्या विरहाने झुरुन सोडला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:43 PM2022-04-29T17:43:55+5:302022-04-29T17:50:57+5:30
धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. अन् मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले.
संजय सुर्वे
शिरगाव : कोळकेवाडी धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. मात्र, पुन्हा त्याला त्याठिकाणी गेला असता मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले. सुजय गावठे याच्या आठवणीत ‘कॅस्पर’ने प्राण सोडताच सारेच हळहळले.
माणसापेक्षा मुकी जनावरे खूप प्रामाणिक असतात हे अलोरे येथील सुजय गावठेच्या ‘कॅस्पर’ श्वानाने दाखवून दिले. दोन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरणात चौघेजण बुडल्याची घटना घडली होती. यात दोघेजण वाचले तर अन्य दोघेजण बुडाले. त्यातील ऐश्वर्या खांडेकर हिचा मृतदेह सापडला. मात्र, सुजय गावठे हा अद्यापही बेपत्ता आहे.
या घटनेवेळी सुजय बुडत असल्याचे पाहून त्याचा लाडका श्वान ‘कॅस्पर’नेही पाण्यात उडी मारली आणि मोठ्यामोठ्याने भुंकू लागला. मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याचे प्रयत्न असफल ठरले. पाण्यात पोहत पोहत तो तांबडवाडीमध्ये बाहेर पडला. त्यानंतर त्याला घरात आणण्यात आले. घरामध्ये आल्यानंतर तो खूप शांत होता. त्याने काहीही खाल्ले नाही. आपला मालक परत येईल याची तो वाट पाहू लागला आणि त्याने या घटनेचा धसकाच घेतला.
दुसऱ्या दिवशी त्याला कोळकेवाडी येथे घटनास्थळी नेण्यात आले. त्या ठिकाणी सुजयला शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु, आपला मालक त्याला कुठेही दिसला नाही. त्यामुळे तो व्याकुळ झाला आणि तेथून तो घरी परतला. घरी आल्यानंतर मात्र त्याने अन्नाचा त्यागच केला आणि घराच्या अंगणातच त्याने प्राण सोडला. जिथे सुजय तिथे त्याचा लाडका ‘कॅस्पर’ हे एक समीकरण बनले होते. अनेकदा मालकासोबत दुचाकीवर बसून फेरी मारण्याचा आनंद ‘कॅस्पर’ घ्यायचा. बेपत्ता झालेला आपला मालक घरी न आल्याने या श्वानाने माणसापेक्षाही मोलाची निष्ठा मालकाप्रती जपली आणि आपल्या प्राणाचा त्याग केला.