ठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड केली कोकणच्या सुपुत्राने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 02:28 PM2019-01-24T14:28:41+5:302019-01-24T14:29:52+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमासाठी कलाकारांची निवड करणे खूपच कठीण होते, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमासाठी कलाकारांची निवड करणे खूपच कठीण होते, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे हा सिनेमा माझ्या आयुष्यातील पहिलाच बायोपिक आहे, ज्याचं कास्टींग मी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मला या निवडीसाठी खुप अभ्यास करावा लागला. खुपसे संदर्भ तपासावे लागले. बाळासाहेबांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या घटनांचा अंदाज घ्यावा लागला. कोणता माणूस कोणत्या व्यक्तिरेखेला साजेसा राहील. या कास्टींगसाठी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील कलाकारांचा विचार केला गेला होता.
बायोपिकमध्ये काम करताना संबंधित व्यक्तिरेखेच्या मिस मॅच जागा कलाकाराने अभिनयाने भरून काढायच्या असतात तर मिस मॅच जागा कमीत कमी असतील असा कलाकार शोधणं हे आर्ट डायरेक्टरचं काम असतं. ठाकरेमध्येही नवाजच्या रुपाने ठाकरेसाहेबांच्या एकूणच बॉडी लॅग्वेजशी साधर्म्य असणारा कलाकार मिळाला. नवाजचं चालणं, काही हावभाव हे थेट साहेबांची आठवण करुन देणारे होते. त्यामुळेच नवाज साहेबांच्या व्यक्तिरेखेत चपखल बसला. नवाजनेही साहेबांच्या बॉडी लॅग्वेजचा अभ्यास केला. भाषणं ऐकली आणि मग अभिनय सादर केला.
राज आणि उद्धव यांच्या व्यक्तिरेखेविषयी ठोस असं काही ठरवलं गेलं नव्हतं. पण दिग्ददर्शकांनी सांगितल्यानुसार मी या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असणारी व्यक्ती शोधत होतो. ही शोधमोहीम बरीच अवघड होती. पण या सिनेमाचं कास्टींग हातात घेतल्यानंतर असावेत म्हणून मी या दोघांच्या व्यक्तिरेखांचा रिसर्च सुरु ठेवला होता. आयत्या वेळचा गोंधळ टाळण्यासाठी केलेली ही युक्ती बरीच कामाला आली, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे सिनेमाच्या कास्टींगला जवळपास साडेतीन ते चार महिन्यांचा वेळ लागला. कारण या सिनेमात अनेक व्यक्तिरेखा आहेत. आनंद दिघे, दत्ता साळवी या आणि अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. या सिनेमासाठी जवळपास ७० ते ८० चेहरे मॅच करावे लागले. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेक व्यक्तिरेखांसाठी मॅच शोधावे लागले.
या सिनेमात आनंद दिघेंची व्यक्तिरेखा माझ्या मित्रांच्या काकांनी केली आहे. म्हणजेच काही चेहरे आसपास होते तर काही जाणीवपूर्वक शोधावे लागले. गजानन कीर्तीकर यांच्या व्यक्तिरेखेचंही तसंच झालं. माझ्या बाबांच्या आणि कीर्तीकरांच्या चेहेऱ्यात असलेलं साम्य लक्षात आलं आणि माझे किराणा दुकानदार बाबा सिनेमात काम करायला तयार झाले. त्यामुळे या सिनेमात केवळ नावाजलेले अभिनेतेच नाही तर काही सामान्य माणसांमधील अभिनेतेही आहेत, असे त्यांनी सांगितले.
माँसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृताच का?
माँसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतल्यावर मला एकच शब्द आठवला तो म्हणजे सोज्वळ. या व्यक्तिरेखेसाठी मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो जिच्या चेहऱ्यावर निरागस आणि सात्विक भाव असतील. मग मेक अप केलेला असो वा नसो. त्यावेळी मी अमृताचा विवाह हा सिनेमा बघत होतो. त्यातील तिचा अभिनय, हावभाव पाहूनच मी माँसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृताची निवड केली.