पावसामुळे तयार होईनात गड-किल्ले; बच्चे कंपनीमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 02:10 PM2019-10-26T14:10:11+5:302019-10-26T14:11:09+5:30
पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.
रत्नागिरी : बच्चे कंपनीची परीक्षा संपून गुरूवारपासून दीपावलीची सुटी सुरू झाली. दीपावलीत बच्चे कंपनी खास मातीचे किल्ले तयार करते. मात्र, पावसामुळे किल्ले तयार करण्यात अडचण निर्माण झाल्याने बच्चे कंपनीमध्ये नाराजी आहे. शहरात काही मंडळांतर्फे आकर्षक किल्ले स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले कुठे तयार करावे, असा प्रश्न आहे.
ग्रामीण भागात दिवाळीपूर्वी घरासमोर अंगण तयार केले जात असे. अंगणातील एका कोपºयात मातीने लिंपून किल्ला तयार करण्यात येत असे. परंतु, केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातदेखील किल्ले तयार केले जातात. कोणत्या तरी एका किल्ल्याची संकल्पना घेऊन मोठ्यांच्या सहकार्यातून किल्ले तयार केले जातात. माती लिंपून किल्ले तयार करण्याबरोबरच आकर्षक गढी किंवा बुरूजही उभारण्यात येतात. काही ठिकाणी काल्पनिक तर काही ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते. शिवाय किल्ल्यांना आकर्षक रंगरंगोटीदेखील करण्यात येत आहे.
मेथी, मोहरी टाकून हिरवळ उगविण्यात येते. पूर्वी बच्चे कंपनी खेळण्यातील बाहुल्या किंवा शोभेच्या वस्तूंनी किल्ल्याचे सुशोभिकरण करीत असत. मात्र, आता तयार मावळे, शिवाजी महाराज तसेच प्राणी इतकेच नव्हे तर रेडिमेड किल्लेदेखील बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. १० ते ५० रूपयांपर्यंत मावळे, शिवाजी महाराजांच्या मूर्ती विकण्यात येत आहेत. तर तयार किल्ले १५० ते ३०० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहे. पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.
शहरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये गॅलरीच्या कोपऱ्यात हा किल्ला ठेवून सुशोभिकरण केले जाते किंवा इमारतीच्या बेसमेंटमध्ये किल्ला उभारण्यात येत आहे. छोट्या-छोट्या हाताने माती भिजवून ती लिंपून दगड किंवा विटांचे तुकडे यांच्याद्वारे सुशोभिकरण करून रंगरंगोटी केली जाते. पाण्याची कारंजी किंवा धबधबेदेखील दाखविण्यात येतात.
किल्ले बनविले जाणार
किल्लाप्रेमी मंडळांकडून किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले तयार करण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी किनाºयांवर बच्चे कंपनीकडून असे किल्ले तयार केले जातात.