सीबीएसईची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:33 AM2021-05-11T04:33:02+5:302021-05-11T04:33:02+5:30
योगासनाचे धडे खेड : शहरातील खांब तळ्याजवळील शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या इमारतीतील कोरोना केंद्रात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या ...
योगासनाचे धडे
खेड : शहरातील खांब तळ्याजवळील शिवतेज आरोग्यसेवा संस्थेच्या इमारतीतील कोरोना केंद्रात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांचा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगासनाचे धडे देण्यात येतात. शिवाय, रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. योगप्रशिक्षक व कळंबणी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळंणगावकर योगासनाचे धडे देत आहेत.
कलिंगडाला मागणी
रत्नागिरी : तीव्र उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावत असल्याने घशाला सतत कोरड पडत आहे. त्यामुळे कलिंगडासाठी विशेष मागणी होत आहे. २० रुपये किलो दराने विक्री सुरू असून द्राक्षालाही वाढती मागणी आहे. कलिंगडाचे ढीग हातोहात संपत आहेत.
लसीकरण केंद्राची मागणी
राजापूर : राजापूर व लांजा तालुक्यांतील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित यशवंतराव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहे. ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
दापोली : तालुक्यातील आसूद गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेली दोन वर्षे या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले असून, तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. मुरूड, कर्धे गावांतील रस्ते नादुरुस्त झाले आहेत.
योजनेबाबत आवाहन
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून अटल वयो अभ्युदय योजनेंतर्गत सर्व वृद्धांची चांगल्या प्रकारे देखभाल करण्यासाठी वृद्धाश्रम योजना सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत वृद्ध महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सर्व राज्यात वृद्धांकरिता चांगल्या प्रतीचे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
जैतापूर येथे मच्छी ओटे
राजापूर : तालुक्यातील जैतापूर चव्हाटावाडी व मधलीवाडी येथे पतन विभाग रत्नागिरीतर्फे दोन मच्छी ओटे बांधण्यात येत आहेत. सरपंच रेखा फोंडेकर व श्रीदेव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मांजरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रुती मांजरेकर, सदस्य नीरजा मांजरेकर आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांमध्ये धसका
रत्नागिरी : नगर परिषदेच्या पथकातर्फे शहरात बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. नंदकुमार पाटील व किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथक सकाळपासून बाजारपेठेत फिरून पाहणी करीत आहे. कोरोना आपत्तीचे नियम न पाळणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई केली जात आहे.