सीसी कॅमेऱ्यामुळे होताहेत गंभीर गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:28+5:302021-06-23T04:21:28+5:30
चिपळूण : झपाट्याने वाढत असलेल्या चिपळूण शहरात जागोजागी सीसी कॅमेरे बसविण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे; मात्र त्याकडे नगर ...
चिपळूण : झपाट्याने वाढत असलेल्या चिपळूण शहरात जागोजागी सीसी कॅमेरे बसविण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे; मात्र त्याकडे नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आले आहे. अशातच मध्यवर्ती बस स्थानकातील सीसी कॅमेऱ्यामुळे दोन गंभीर गुन्हे उघड झाल्याने पुन्हा एकदा शहरात कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चार दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे येथे एका २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेतील नराधम पोलिसांच्या जाळ्यात सापडला. याप्रकरणी पोलिसांना आलेले यश निव्वळ येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात जागोजागी बसविलेल्या सीसी कॅमेऱ्यामुळेच शक्य झाले. या ठिकाणच्या फुटेजमुळे आरोपीच्या बहुतांशी हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या. त्यामुळेच पोलिसांना त्या नराधमापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. याआधी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणातील आरोपी पकडण्यासाठी बस स्थानकातील फुटेजचा उपयोग झाला होता. केवळ गंभीर गुन्हे नव्हे तर छोट्या-मोठ्या अनेक चोऱ्या या कॅमेऱ्यामुळे उघड झाल्या आहेत.
येथे दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. त्यापटीत रहदारीही वाढली आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात व मोक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्याची मागणी अनेक वर्षे केली जात आहे. त्यासाठी नगर परिषदेने सर्वेक्षण केले होते. साधारण ६० ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्याचा विचार झाला होता; मात्र त्यावर निर्णय झाला नाही. परिणामी, शहरवासीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ज्या ठिकाणी पीडित तरुणीवर अत्याचाराची घटना घडली, ते ठिकाण नेहमी गजबजलेले असते. तरीही ही घटना घडल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आतातरी डोळे उघडावेत, अशी मागणी केली जात आहे.
-----------------------------
अजूनही वेळ गेली नाही. नगर परिषदेने शहरात सीसी कॅमेरे बसविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. आपण याआधी अनेकवेळा निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आता नगर परिषदेच्या या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांचे नुकसान होऊ लागले आहे. भरवस्तीत व बाजारपेठेत एखाद्या तरुणीवर अत्याचार होत असेल, तर ती चिपळूणकरांसाठी तितकीच दुर्दैवी बाब आहे. तेव्हा आतातरी नगर परिषद याविषयी गांभीर्याने घ्यावे.
लियाकत शाह, माजी उपनगराध्यक्ष, चिपळूण.