रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड वाहतुकीवर सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर, कुंभार्ली घाटात बसवले कॅमेरे
By संदीप बांद्रे | Published: October 11, 2023 06:28 PM2023-10-11T18:28:48+5:302023-10-11T18:29:45+5:30
काही व्यापारी विना परवाना लाकडाची वाहतूक करतात
चिपळूण : तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. सातत्याने विनापरवाना लाकूडतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. विनापरवाना लाकडाची परजिल्ह्यात वाहतूक केली जाते. या पार्श्वभुमीवर तपासणी नाक्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात होती. अखेर वनविभागाने त्याची दखल घेतली आहे. पहिल्या टप्प्यात कुंभार्ली घाटातून पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या लाकूड वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी पोफळी तपासणी नाक्यात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
जागतिक तापमान वाढीचे परिणाम जाणवत असतानाच राजरोसपणे अनेक ठिकाणी बेकायदा जंगलतोड केली जाते. अनेकदा पर्यावरण प्रेमींकडून याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाकडून संबंधीतावर कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांमध्ये सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी येथील ग्लोबल चिपळूण टुरीझमच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार खाडे यांनी १५ दिवसात कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले होते. पोफळी, साखरपा आणि भरणे नाका येथे वनविभागाचे तपासणी नाके आहेत. या तिन्ही नाक्यातूनच परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. काही व्यापारी विना परवाना लाकडाची वाहतूक करतात. केवळ चिपळूण तालुक्यातून दररोज किमान १५ ते २० ट्रकची वाहतूक होते. त्यामुळे तिन्ही तपासणी नाक्यात सिसिटिव्ही बसविण्याचे नियोजन वनविभागाकडून करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात पोफळी येथील तपासणी नाक्यात सिसिटिव्हीची यंत्रणा उभारली आहे. पुढील काही दिवसात साखरपा आणि भरणेनाका येथील नाक्यांमध्ये सिसिटिव्हीची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. कुंभार्ली घाटातून सातारा जिल्ह्यात बेकायदा होणाऱ्या लाकूड वाहतूकीवर आता सिसिटीव्हीची नजर असणार आहे.
रत्नागिरी वन विभागांतर्गत जिल्ह्यांच्या सिमाभागात वनउपज तपासणी नाक्यांची स्थापना करण्यात आली आहे. तपासणी नाक्यांवरील सिसिटीव्हीमुळे अवैद्य वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण करता येईल. भरणेनाका आणि साखरपा येथील तपासणी नाक्यांमध्येही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. - दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी