मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे,शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:37 PM2020-07-27T14:37:36+5:302020-07-27T14:38:46+5:30

अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून १ ते ६ सिलिंडर मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व नौका मालकांना दिले आहेत़

CCTV cameras on fishing boats, government crackdown | मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे,शासनाचा दणका

मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे,शासनाचा दणका

Next
ठळक मुद्देमासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे,शासनाचा दणकाअवैध मासेमारीला लगाम, १ ते ६ सिलिंडर नौकांवर कॅमेरा लावणे बंधनकारक

रत्नागिरी : अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून १ ते ६ सिलिंडर मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व नौका मालकांना दिले आहेत़

जिल्ह्यात गेली अनेक वर्षे पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससीननेटधारक मच्छीमार यांच्यामध्ये वाद सुरु आहेत़ पर्ससीननेट मासेमारी विरोधात अनेकदा पारंपरिक मच्छिमारांनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली होती.

मासेमारी नियमाअंतर्गत पर्ससीन, एलईडी, ट्रॉलिंग इत्यादी मासेमारी पद्धतीचे नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी आदेश व अधिसूचना शासनामार्फत काढण्यात आली आहे. मात्र, मत्स्य विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीबाबत पारंपरिक मच्छिमारांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़

काही वेळा परप्रांतीय मच्छिमारांकडून राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसून अवैधपणे मासेमारी करतात़ तसेच स्थानिक मच्छीमारही शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करुन अवैधरित्या मासेमारी करताना आढळतात़ त्यामुळे शाश्वत मासेमारी टिकून ठेवण्यात अडचण निर्माण होते़

अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी तसेच मच्छिमारांच्या विविध समस्यांसंदर्भात मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, मत्स्य विकास आयुक्त तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीसह काही संघटनांची बैठक झाली.

या बैठकीत मच्छिमार संघटनांनी अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती़ या बैठकीत अवैध मासेमारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश मंत्री शेख यांनी दिले आहेत़ या आदेशाचे मच्छिमारांनी स्वागत केले आहे़

कॅमेऱ्यातील माहिती १५ दिवस राखून ठेवणे बंधनकारक

एक ते सहा सिलिंडर नौकेवर मच्छिमारांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आदेश दिले आहेत़ कॅमेऱ्यामुळे मच्छिमारांनी केलेली मासेमारी, मासेमारी पध्दतीचे अनुपालन तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जवळच्या परिसरात असणारी मासेमारी नौका आदींची माहिती उपलब्ध होणार आहे़.

त्यामुळे समुद्रात होणाऱ्या मासेमारीवर नियंत्रण राहणार असून, देखरेख प्रभावीपणे राहू शकेल. मासेमारी करुन आल्यानंतर कमीत कमी १५ दिवस कॅमेऱ्यामधील माहिती राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे़
 

Web Title: CCTV cameras on fishing boats, government crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.