दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 11:43 AM2021-12-24T11:43:16+5:302021-12-24T11:44:12+5:30
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला.
साखरपा : दाट धुके आणि काळोखामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार झाला. अजय नीळकंठ शिंदे (वय-२५, रा. मठ धामापूर, ता. संगमेश्वर) असे या मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता घडला.
याबाबत माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रक (एमएच ०४, केएफ ९८४१) रत्नागिरीहून बुधवारी (दि.२२) रात्री कोल्हापूरकडे सिमेंट घेऊन चालला होता. हा ट्रक संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - वाणीवाडी दरम्यान आला असता दाट धुके आणि काळोखामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. यामध्ये अजय शिंदे हा चालक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक उलटताच मोठ्याने आवाज आल्याने ग्रामस्थ खडबडून जागे झाले. आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र, काळोखामुळे ग्रामस्थांना मदत कार्यात अडचण येत होती. सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ट्रक खाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची ओळख पटली.