पंचेचाळीस वर्षांवरील लसीकरणाची जबाबदारी केंद्राची : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:59+5:302021-05-08T04:33:59+5:30
राजापूर : १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासन लस पुरवत असून, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांचे लसीकरण सुरळीतपणे ...
राजापूर : १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासन लस पुरवत असून, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांचे लसीकरण सुरळीतपणे होत आहे, मात्र ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी आमची नसून ती केंद्र सरकारची आहे. त्यामुळे केंद्र सरकार ज्यावेळी लस पुरवेल त्यातूनच त्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजापूर येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही सामंत यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध करण्याबाबत काय उपयायोजना वा मागणी केली आहे, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मागणी केलेली आहे, ती आल्यानंतरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळेल, असे सांगण्यात आले.
राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर राजापूर तालुक्याला भेट देण्यासाठी शुक्रवार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. लसीकरणाबाबत सुरू असलेल्या सावळा गोंंधळाबाबत यावेळी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद आहे, तर यापूर्वी ज्या ४५ वर्षांवरील लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत संपूनही त्यांना दुसरा डोस उपलब्ध झालेला नाही, या प्रश्नावर मंत्री सामंत म्हणाले की, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस हा केंद्र सरकार पुरवित असून, या वयोगटातील नागरिकांची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. मग त्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी करायचे काय, असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, केंद्राकडून लस उपलब्ध झाल्यावर ती त्या वयोगटातील नागरिकांना दिली जाईल, असे सांगण्यात आले. अशा प्रकारे ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या किती असू शकते, या पत्रकारांच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाकडे मतदार यादी आहे, त्यामुळे केंद्र सरकार ती तपासू शकते असे सांगत ४० टक्के जनता या वयोगटात असल्याची पुष्टी यावेळी मंत्र्यांनी जोडली.
या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे उपस्थित होते.
ओणी काेविड रुग्णालयाचा मुहूर्त कधीचा?
आमदार राजन साळवी यांनी पुढील आठ दिवसांत ओणी येथील कोविड रुग्णालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आढावा बैठकीत सांगितले हाेते, मात्र पत्रकार परिषदेत पंधरा दिवस तरी हे रुग्णालय सुरू होण्यासाठी जातील असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तर पुन्हा एकदा राजापूर व रायपाटण ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली, मात्र कधी, त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही.