सीईटीचे संकेतस्थळ अद्याप बंद; विद्यार्थी, पालक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:09+5:302021-07-27T04:33:09+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर सीईटी परीक्षा दि.२१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे; ...
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर सीईटी परीक्षा दि.२१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे; मात्र तत्पूर्वी अर्ज भरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले होते. दि.२० ते २६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली होती. पहिल्या दिवशी संकेतस्थळ सुरू असल्याने काही जागरुक पालक पाल्याचे अर्ज भरू शकले; मात्र त्यानंतर संकेतस्थळ अद्याप बंद असून, सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख हाेती. पालक, विद्यार्थी संभ्रमात असून अर्ज भरण्यासाठी अवधी देण्याचे मंडळाने घोषित केले आहे.
कोरोनामुळे परीक्षा घेणे शक्य नसल्याने अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल घोषित करण्यात आला आहे; मात्र अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने परीक्षेचे अर्ज सीईटीच्या संकेतस्थळावर भरावयाचे होते. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार होती; मात्र संकेतस्थळच बंद असून अद्याप अर्ज भरण्याचीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
शिक्षण मंडळाकडून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत अर्ज भरण्यासाठी पुरेसा अवधी दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थी मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत.
---------------------------
तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ बंद असल्याचे सांगून संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे, शिवाय अर्ज भरण्यासाठी पुरेसा अवधीही दिला जाणार आहे.
काही तांत्रिक कारणास्तव सीईटीचे संकेतस्थळ बंद असले तरी संकेतस्थळ सुरू झाल्याचेही कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे
नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता पुरेसा वेळही दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ बंद असल्याने गोंधळून न जाता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.
- डाॅ. शिवलिंग पटवे, सचिव, कोकण मंडळ