रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले - इच्छुकांची खुर्चीसाठी होणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:51 AM2019-11-20T11:51:40+5:302019-11-20T11:53:36+5:30
संगमेश्वर तालुक्यातील सदस्य व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम हेही खेड तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न राहणार असल्याची चर्चा
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपद अडीच वर्षांसाठी खुले झाल्याने इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी दोन बनेंच्या नावाची चर्चा होत असली तरी खेड तालुक्यातूनही नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी यांची सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती. मंगळवारी मुंबईत राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले. त्यामुळे अनेक इच्छुक आता बाशिंग बांधून तयार झाले आहेत. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व असून, ५७पैकी ३८ सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे.
अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असली तरी ज्या सदस्याला नियोजन मंडळ देण्यात आलेले आहे, त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा सभापती यापैकी पद मिळणार नाही, असे शिवसेनेत लिखित स्वरुपात वरिष्ठस्तरावर ठरले आहे. ३८ सदस्यांपैकी १६ जणांना नियोजनचे सदस्य पद मिळाले. उर्वरित २३ पैकी १२ सदस्यांना मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतीपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी उर्वरित ११ सदस्यांना या पदांवर संधी मिळणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याला दोन पदे मिळणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचे नाव इच्छुकांमध्ये पुढे असले तरी ते गेली अडीच वर्षे नियोजनचे सदस्य आहेत. या पाच वर्षांच्या टर्ममध्ये रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांना अध्यक्षपद मिळालेले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा अध्यक्षपदासाठी विचार होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सदस्य व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम हेही खेड तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न राहणार असल्याची चर्चा असून, त्यामध्ये त्यांचे बंधू व बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम हे नावही पुढे येऊ शकते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी संगमेश्वरमधून रोहन बने आणि कदम यांच्या नावाची जोरेदार चर्चा सुरु आहे.
रत्नागिरी, लांजा स्पर्धेतून बाद होणार?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यास सन २००० पासून सुरुवात झाली. त्यामध्ये ३ वेळा महिला, एका वेळेसाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गासाठी राखीव होते. मागील अडीच वर्षात रत्नागिरी आणि लांजा - राजापूर तालुक्याला अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये ३१व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
नियोजनचे सदस्य नसलेले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य
खेड- सुनील बाबाराम मोरे, स्वप्नाली पाटणे.
गुहागर- महेश नाटेकर.
रत्नागिरी - महेश म्हाप, रोहन बने, पर्शुराम कदम, मानसी साळवी, ऋतुजा जाधव.
लांजा - चंद्रकांत मणचेकर, पूजा नामे.
राजापूर - लक्ष्मी शिवलकर.