सभापतीपदाची निवड बिनविरोध
By admin | Published: December 26, 2014 10:41 PM2014-12-26T22:41:40+5:302014-12-26T23:50:41+5:30
चिपळूण पालिका : शिक्षण समिती निर्मला चिंगळे यांच्याकडे कायम...
चिपळूण : येथील नगरपरिषदेच्या बांधकाम, शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय, नियोजन विकास, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाची आज (शुक्रवारी) घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली. बांधकाम समितीचे सभापतीपद बरकत वांगडे, शिक्षण समितीचे सभापतीपद निर्मला चिंगळे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात विविध विषय समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम प्रांताधिकारी रवींद्र हजारे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. सकाळी ११ ते १२ या वेळेत विविध विषय समिती सदस्य निश्चित करण्यात आले. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत सभापती पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरुन घेण्यात आले. २ ते २.३० या वेळेत अर्जांची छाननी करण्यात आली. २.४५ नंतर विविध विषय समिती सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी बरकत वांगडे, शिक्षण समितीच्या सभापतीपदी निर्मला चिंगळे, नियोजन विकास समितीच्या सभापतीपदी कबीर काद्री, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी रुक्सार अलवी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिल्पा खापरे, तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांची निवड करण्यात आली आहे. विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने नियोजित वेळेनंतर सभापतीपदांची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हजारे यांनी घोषणा केली.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी यापूर्वी शिल्पा सप्रे-भारमल, वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतीपदी आदिती देशपांडे, तर पाणी पुरवठा सभापती म्हणून कबीर काद्री हे काम पाहात होते. त्यांच्या जागेवर अन्य चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. स्थायी समितीवर पदसिध्द नगराध्यक्ष व सर्व विषय समित्यांचे सभापती असून, चिपळूण विकास आघाडीतर्फे शहाबुद्दिन सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुचय रेडीज, चिपळूण शहर विकास आघाडीतर्फे मोहन मिरगल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी आदिती देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. विविध विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. (वार्ताहर)
कार्यकर्त्यांची वानवा
चिपळूण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी राजकीय पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे सभापती निवड असतानाही चिपळूण पालिकेचा आवार नेहमीसारखाच भासत होता. सभापती निवडीत कोणतेही छुपे राजकारण न करता निवड प्रक्रिया पार पडल्याने लक्ष लागलेल्या या निवडीची इतिश्री झाली.