सभापती, उपसभापतींना धक्का

By admin | Published: October 7, 2016 10:29 PM2016-10-07T22:29:12+5:302016-10-07T23:50:15+5:30

दापोली पंचायत समिती : ओणनवसे, साकुर्डे गण नवीन रचनेत बदलल्याने संधी हुकणार

Chairperson, push to subpoena | सभापती, उपसभापतींना धक्का

सभापती, उपसभापतींना धक्का

Next

दापोली : दापोली पंचायत समितीच्या विद्यमान सभापती दीप्ती निखार्गे आणि उपसभापती उन्मेष राजे यांचे अनुक्रमे ओणनवसे व साकुर्डे हे गण नवीन रचनेत बदलल्याने या दोघांनाही अन्य गणातून नशीब आजमावावे लागणार आहे.
शहरातील रसिकरंजन नाट्यगृहात प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार कविता जाधव यांनी दापोली तालुक्यातील १२ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर केली. एकूण १२ गणांपैकी ६ गणांवर महिला तर ६ गणांवर पुरूष उमेदवारांना संधी मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य नीलेश जालगावकर यांचा टाळसुरे पंचायत समिती गणातही बदल झाल्याने त्यांना अन्य गणातून नशीब आजमावावे लागणार आहे. तालुक्यात पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे : - केळशी पंचायत समिती गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अडखळ - अनुसूचित जमाती, पालगड - सर्वसाधारण, खेर्डी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, गिम्हवणे-सर्वसाधारण स्त्री, हर्णै -सर्वसाधारण, जालगाव- सर्वसाधारण, टेटवली - सर्वसाधारण स्त्री, असोंड -सर्वसाधारण स्त्री, उन्हवरे - सर्वसाधारण स्त्री, बुरोंडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, दाभोळ - सर्वसाधारण. तालुक्यात यापूर्वीएकूण १४ गण होते. मात्र, नवीन रचनेनुसार ही गणसंख्या १२ झाली असून, साकुर्डे, ओणनवसे, आंजर्ले आणि टाळसुरे हे गण लोकसंख्येच्या निकषानुसार अन्य गणांमध्ये विभागले गेले आहेत. यामुळे या गणांमधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आता अन्य गणांमध्ये नशीब आजमावावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात अडखळ आणि टेटवली असे २ नवीन गण लोकसंख्येच्या निकषानुसार निर्माण झाले असून, येथे स्थानिक उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे. आरक्षण सोडत आणि गणरचना कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार एस. आर. कोरवी, महसूल नायब तहसीलदार श्वेता आल्हात, तहसीलदार कार्यालय निवडणूक अधिकारी, आदी उपस्थित होते. ही सोडत ऐकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गर्दी केली होती. तालुक्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता पंचायत समिती निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)


भगवान घाडगे पक्षापासून दूर : राजेंद्र फणसे, नीलेश जालगावकर अन्य मतदार संघाच्या शोधात
केळशी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा हुकुमी एक्का म्हणून परिचित असलेले आणि सध्या शिवसेनेपासून चार पावले लांब असलेले भगवान घाडगे हे २० वर्षांहून अधिककाळ येथून निवडून येत आहेत. मात्र, त्यांच्या गटातदेखील ओबीसी महिला आरक्षण पडल्याने भगवान घाडगे यांनाही नवीन गट शोधावा लागणार आहे. घाडगे यांचा लोकसंग्रह मोठा असून, त्यांचे अन्य पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शिवसेनेत कोणताही निर्णय घेताना भगवान घाडगेंनी कौल दिल्याशिवाय पान हलत नव्हते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत घाडगे यांना पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतल्याने त्यांना मानणाऱ्या मतदारांची मते अन्य पक्षाकडे वळली होती. सध्या शिवसेना आणि घाडगे यांच्यामध्ये राजकीय कटुता आहे.
पालगड जिल्हा परिषद गटात सर्वांना सोबत घेऊन काम करणारे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांच्या गटातही ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांना आता अन्य गटातून उमेदवारी मिळवणे शक्य होते का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे


तालुक्यात पूर्वी केळशी, पालगड, हर्णै, टाळसुरे, उन्हवरे, दाभोळ, जालगाव असे ७ जिल्हा परिषद गट होते. नवीन रचनेनुसार दाभोळपेक्षा बुरोंडीची लोकसंख्या वाढल्याने दाभोळ गटाचे नामकरण बुरोंडी जिल्हा परिषद गट झाले आहे. तर असोंडची लोकसंख्या उन्हवरेहून अधिक झाल्याने उन्हवरे गटाचे नामकरण असोंड जिल्हा परिषद गट असे झाले आहे. आता केवळ ६ जिल्हा परिषद गट अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, केळशी जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला, पालगड - ओबीसी महिला, हर्णै - सर्वसाधारण, जालगाव - सर्वसाधारण महिला, असोंड - नागरिकांचा मागास प्रवर्ग, बुरोंडी - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. केळशी आणि पालगड वगळता पूर्वीच्या उन्हवरे आणि आत्ताच्या असोंड जिल्हा परिषद गटातील विनायक गायकवाड यांना या बदलाचा धक्का बसला. येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता येथून कट झाला आहे.

Web Title: Chairperson, push to subpoena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.