चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 02:42 PM2020-03-12T14:42:56+5:302020-03-12T14:43:51+5:30
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ३० वाजता चिपळूण शहरातून केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला.
चिपळूण : चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय चांगलाच गाजत आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख अजून निश्चित होत नसतानाच सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच्या वाढीव दराचा मुद्दा गाजत आहे. वाढीव दराच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी १०. ३० वाजता चिपळूण शहरातून केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक काढून निषेध करण्यात आला.
शहरातील सांस्कृतिक केंद्राचा विषय सध्या जोरात गाजत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर चिपळूण नगर परिषदेतही महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली असली तरी महाविकास आघाडीतच फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुहे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. सांस्कृतिक केंद्राच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांच्या या आरोपामुळे नगराध्यक्ष विरूद्ध नगरसेवक यांच्यात शाब्दिक युद्धही सुरू झाले आहे.
सांस्कृतिक केंद्राच्या कामात वाढीव खर्च, मंजुरी न घेता परस्पर केलेली कामे, खुर्च्यांच्या खरेदीसाठी वाढीव दर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जनतेला देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
सांस्कृतिक केंद्राच्या कामाबाबत नगरसेवकांनी विशेष सभेची मागणीही केली होती. त्यानुसार गुरूवारी सकाळी विशेष सभा बोलावण्यात आली होती. तत्पूर्वी नगरसेवकांनी सांस्कृतिक केंद्रात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांची मिरवणूक काढली. खुर्च्यांचे पूजन करून ही मिरवणूक सांस्कृतिक केंद्र ते नगर परिषद अशी काढण्यात आली होती. या मिरवणुकीद्वारे सांस्कृतिक केंद्राच्या कामाचा निषेध करण्यात आला.
खुर्ची पूजन रॅलीला चिपळूणमध्ये नागरिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. या रॅलीत नागरिक, नगरसेवक आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.