Ratnagiri crime: चाकरमानी भावाला बागेत कचरा टाकू नका म्हणून सांगितलं, रागातून वृद्धाला बेदम मारहाण
By अरुण आडिवरेकर | Published: March 17, 2023 01:51 PM2023-03-17T13:51:45+5:302023-03-17T13:52:07+5:30
काजूच्या बागेत जेवणाऱ्या पत्रावळी, काेल्ड्रिंक, दारूच्या बाटल्या टाकल्या
रत्नागिरी : चुलत भावाला बागेत कचरा टाकू नका, असे सांगितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण केल्याची घटना देवधामापूर - तेलीवाडी (ता. संगमेश्वर) येथे घडली. हा प्रकार १६ मार्च राेजी दुपारी १२:३० वाजता घडला असून, गाेविंद राजाराम खांडेकर (६२, रा. देवधामापूर-तेलीवाडी) हे जखमी झाले आहेत.
देवरुख पाेलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संजय जगन्नाथ सावंत (रा. देवधामापूर-तेलीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाेविंद खांडेकर आणि संजय सावंत हे एकमेकांच्या शेजारीच राहतात. संजय सावंत याचा चुलत भाऊ शिमगाेत्सवासाठी पुण्याहून गावी आला हाेता. गाेविंद खांडेकर यांनी काजूच्या बागेत जेवणाऱ्या पत्रावळी, काेल्ड्रिंक, दारूच्या बाटल्या टाकू नका. समाेरच्या नाल्यात किंवा खड्ड्यात टाका, असे चाकरमान्यांना समजावून सांग, असे संजय याला सांगितले हाेते.
शिमग्याचा सण झाल्यावर चुलत भावाला सूचना दिल्याच्या रागातून संजय याने गाेविंद खांडेकर यांच्या अंगणात येऊन शिवीगाळ केली. तसेच प्लास्टिकच्या पाइपने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत गाेविंद खांडेकर हे जखमी झाले असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.