कोकण किनारपट्टीवर दोन दिवस पावसाची शक्यता
By शोभना कांबळे | Published: October 17, 2023 06:59 PM2023-10-17T18:59:26+5:302023-10-17T19:00:14+5:30
अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या प्रभावाने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या प्रभावाने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभगाकडून वर्तविण्यात आली आहे. सुरूवातीपासूनच कमी असलेल्या पावसाने यंदा परतीही लवकर घेतली. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतकाच पाऊस पडला आहे. आता सर्वच ठिकाणी पाऊस परतला आहे.
परंतु अरबी समुद्राजवळ केरळपर्यंत साडेतीन किलोमीटर उंचीवर चक्रिय वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात कोकणात विजेच्या लखलखाटासह ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या पावसाने मुक्काम हलवल्याने उकाड्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान, गेले दोन दिवस मळभ दाटून येत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वाटू लागली होती. आता उकाड्यात वाढ होऊ लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्याचे प्रमाण वाढले असताना कोकणात दोन दिवस पाऊस पडण्याच्या शक्यतेने दिलासा मिळाला आहे.