रत्नागिरीत भौतिकशास्त्र पीएचडीची संधी
By Admin | Published: July 14, 2014 12:06 AM2014-07-14T00:06:28+5:302014-07-14T00:11:10+5:30
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुविधा
रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयामध्ये पीएच. डी. करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाला मुंबई विद्यापीठाकडून पीएच. डी. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. १९९२पासून भौतिकशास्त्र या तुलनेने कठीण समजल्या जाणाऱ्या विषयात महाविद्यालयाने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे आजमितीस अनेक विद्यार्थ्यांना मुंबई अथवा पुणे येथे न जाता या विषयातील पदव्युत्तर पदवी घेता येणे शक्य झाले आहे. या विषयात पीएच. डी.चा अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून येत होती. पीएच.डी. अभ्यासक्रम राबविण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच संशोधनासाठी आवश्यक प्रयोगशाळा, ग्रंथालय व इतर सुविधा तसेच पीएच. डी. मार्गदर्शक प्राध्यापक यांची उपलब्धता तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून तज्ज्ञ व्यक्तींची स्थानिक चौकशी समिती नेमण्यात आली होती.या समितीने गेल्या शैक्षणिक वर्षात भौतिकशास्त्र विभागाला व महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक बाबींची तपासणी करुन समाधान व्यक्त केले होते. या समितीने दिलेल्या अहवालावरुन व कोकणामध्ये भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाच्या, विद्यापीठ शिक्षण व संशोधन मंडळाने महाविद्यालयाला संबंधित अभ्यासक्रम चालू करण्याविषयी परवानगी दिली आहे. भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर सुखटणकर हे गेली पंचवीस वर्षे भौतिकशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरस्तरावर अध्यापन तसेच संशोधन करीत आहेत. मुंबई विद्यापीठाचे मान्यतप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शकही असल्यामुळे या विषयात पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. भोळे, डॉ. गडकरी यांच्या समितीने यासंदर्भात विद्यापीठाकडे अहवाल सादर केला होता. (प्रतिनिधी)