कुटुंबात रंगलेल्या राजकारणाची ‘चांदणवेल’
By admin | Published: November 17, 2014 10:04 PM2014-11-17T22:04:03+5:302014-11-17T23:21:58+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : विस्कटलेली कौटुंबीक घडी प्रेक्षकांसमोर आलीच नाही...
मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी स्त्रियांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. राजकीय क्षेत्रातही स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. एकूणच घर सांभाळणाऱ्या गृहिणीने स्थानिक स्वराज्य संस्थेचा सभासद असो वा लोकसभेचा! प्रत्येक ठिकाणी स्वत:चे कर्तृत्व सिध्द केले आहे. परंतु काहीवेळा राजकारणामुळे कुटुंब विस्कळीत झाल्याच्या घटनाही समाजात घडत असतात. अशाच प्रकारचे वास्तव ‘चांदणवेलं’ या नाटकातून लेखक अशोक अष्टीकर यांनी मांडले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेने चांदणवेल सादर केले. परंतु तयारी अपूर्ण असल्याने नाटक निष्प्रभ ठरले. राजकारणात असलेल्या पत्नीमुळे पतीला होणारा मानसिक त्रास, कुटुंबाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कुटुंबाची घडी कशी विस्कळीत होते, हे अष्टीकर यांनी चांदणवेल या नाटकातून रेखाटले असताना ते सादर करताना कलाकार कमी पडले. राज्य नाट्य स्पर्धेत उतरताना ज्या जोमाने तयारी अपेक्षित होती त्या मानाने त्यांचे प्रयत्न यथातथाचे वाटले. काशिनाथ (एम. बी. कदम), वैशाली (श्रध्दा सावंत) ही प्रमुख दोन पात्र. परंतु सुशिक्षित घराण्यातील पतिव्रता स्त्री लंपट राजकारण्यांच्या पाशात गुंतत जाते. पत्नी सोडून गेल्यानंतर पतीला मनस्ताप होतो. मात्र, मुलीवर नितांत प्रेम करणारा बाप, शिवाय वडिलांचा शब्द मांडणारी मुलगी राधा (स्वप्नाली पाचांळ), प्रियकरापेक्षा वडिलांच्या प्रेमाला प्राधान्य देण्यावर ठाम असते. पित्याच्या काळजीसाठी मुलीने लग्नासाठी केलेला त्याग, बापाने लिहिलेला चांदणवेल, मुलीला अजयशी लग्न करण्याचा सल्ला देणारा बाप असे कथानक नाटकातून मांडण्यात आले आहे. स्त्रीलंपट राजकारणी खासदार (अभय पाध्ये) यांचा मुलगा मयंक (विनायक घगवे) याला स्वत:च्या वडिलांचा तिटकारा वाटतो. त्याचे संगीत क्षेत्रावरील विलक्षण प्रेम दिसून येते. प्रेमकहाणी रंगविण्यात अजय, राधा अयशस्वी ठरले. लेखक समाजातील वास्तव चित्रण मांडण्यात यशस्वी ठरले असले तरी दिग्दर्शनात मात्र अभाव जाणवला. तांत्रिक बाबींबरोबर कलाकारांची अपूर्ण तयारी खटकत होती. दु:खाने व्याकुळ झालेल्या प्राध्यापक काशिनाथला मानसिक बळ देण्यात सदानंद शास्त्री (चंद्रकांत जानस्कर) यशस्वी ठरले. बायको सोडून गेल्यावर झालेला मनस्ताप व तो मांडण्यात एम. बी. कदम यशस्वी ठरले. नाटकासाठी संगीत प्रदीप कांबळे यांचे होते, तर नेपथ्य सिध्देश पाचांळ, प्रकाश योजना दयानंद चव्हाण, वेशभूषा प्रियवंदा जेधे, किरणे बेर्डे, स्वप्नगंधा रसाळ यांची होती. श्रध्दा सावंत व स्वप्नाली पांचाळ यांनी केलेले पार्श्वगायन चांगले होते. लांजासारख्या ग्रामीण भागातील संस्थेने स्पर्धेत उतरताना नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. कलाकारांचा प्रयत्न सुंदर असला तरी राज्य नाट्य स्पर्धेचे भान असणे आवश्यक आहे. परंतु यथातथाच असलेल्या सादरीकरणामुळे प्रेक्षकवर्गात मात्र नाराजी दिसून आली. दिग्दर्शकांनी प्रत्येक पात्रावर मेहनत घेणे गरजेचे होते. यापुढे मात्र संस्थेला पुढील स्पर्धेत उतरताना पूर्ण ताकदीने उतरणे गरजेचे आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेने चांदणवेल नाटक सादर केले.