चक्क गणपतीच्या देखाव्यात उतरले चंद्रयान३; घरगुती गणपतीसमोर ‘चंद्रयान ३’चे चलचित्र
By मनोज मुळ्ये | Published: September 24, 2023 01:21 PM2023-09-24T13:21:29+5:302023-09-24T14:11:34+5:30
तब्बल २० दिवस राबून त्यांनी हा देखावा तयार केला आहे. अंतराळ विश्वात भारताने चांगलीच भरारी घेतली आहे.
असुर्डे (चिपळूण) : चंद्रयान ३ मोहिमेमुळे भारताने इतिहास रचला आणि इस्रोच्या या कामगिरीने प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान मिळवले. गणेशोत्सवात विविध पद्धतीच्या देखाव्यांमधून आपली कल्पकता सादर करणारे कोकणी लोकही या मोहिमेमुळे भारावून गेले आणि गणेशोत्सवात अनेक ठिकाणी चंद्रयान ३ मोहिमेच्या प्रतिकृती साकारल्या गेल्या. अर्थात चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक चित्रकार अमित सहदेव सुर्वे यांनी निवळी (ता. चिपळूण) येथे या मोहिमेचे चक्क चलचित्रच तयार केले आहे. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला असून, सुर्वे यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. तब्बल २० दिवस राबून त्यांनी हा देखावा तयार केला आहे. अंतराळ विश्वात भारताने चांगलीच भरारी घेतली आहे.
ऑर्बिट, प्रोफेशनल मॉड्यूल, विक्रम लँडर व रोव्हर यांच्या साहाय्याने इस्रोने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करून दाखविली व एक मोठा इतिहास रचला. त्यांना मानवंदना देण्यासाठी अमित सुर्वे यांनी हा चलचित्र देखावा तयार केला आहे. या देखाव्यात त्यांनी अंतराळात जाणारे पहिले भारतीय विंग कमांडर राकेश शर्मा, भारतीय वंशातील पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला व सुनीता विल्यम्स, तसेच रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत घेऊन जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
याआधी चित्रकार अमित सुर्वे यांनी शालेय जीवनापासून मुंबई येथील पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राणीबागचा राजा येथे स्व. मारुती शिंदे, प्रदीप पंडित व सर्व कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चलचित्र देखाव्याचे काम केले आहे. याचा अनुभव पाठिशी घेऊन त्यांनी हा प्रयत्न केला आहे, यामध्ये मेरी माता स्कूल खेर्डीच्या कला शिक्षिका अमृता अमित सुर्वे यांनी लिखाण व निवेदन केले आहे. तसेच सर्व संकल्पना व तांत्रिक मांडणी स्वत: चित्रकार अमित सुर्वे यांची आहे. या चलचित्राचे ऑडिओ एडिटींग सोहम जाधव यांनी केले आहे. ही गणेशमूर्ती संदीप ताम्हणकर यांनी साकारली असून, या देखाव्यासाठी आराध्य सुर्वे, वेदांत हांदे यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे हे चलचित्र पाहाण्यासाठी परिसरातून येणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक चित्रकार अमित सहदेव सुर्वे यांनी निवळी (ता. चिपळूण) येथे या मोहिमेचे चक्क चलचित्रच तयार केले आहे. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला असून, सुर्वे यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. pic.twitter.com/5cm8nzDYn1
— Lokmat (@lokmat) September 24, 2023