शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:47+5:302021-07-29T04:31:47+5:30
- जिल्ह्यातून ११ हजार ४३२ विद्यार्थी देणार परीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या ...
- जिल्ह्यातून ११ हजार ४३२ विद्यार्थी देणार परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) तारखेत बदल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्ह्यातील १३९ केंद्रांवर ११ हजार ४३२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षांच्या पूर्वनियोजित तारखा वारंवार बदलण्यात आल्या. परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात पालक, विद्यार्थी असतानाच परीक्षा परिषदेतर्फे आठ दिवसांपूर्वी पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार असल्याचे घोषित करून वेळापत्रक निश्चित करण्यात आले. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर आठ दिवस झाले असून, पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ९ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची लेखी परीक्षा होणार असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदलाचा निर्णय घ्यावा लागल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७,७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ९० परीक्षा केंद्र आहेत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) साठी ३,६५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४९ परीक्षा केंद्रं निश्चित केली आहेत. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. कोरोनामुळे एप्रिलमध्ये परीक्षा होणार होती. त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचे निश्चित झाले; मात्र वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. ८ ऑगस्ट सुधारित तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र त्यात पुन्हा बदल करत परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले.
परीक्षेचे हॉल तिकीट संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रात बदल करावयाचा झाल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांशी चर्चा करून आपल्या स्तरावरून पर्यायी केंद्राची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्रावरील कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे परिषदेतर्फे सूचित करण्यात आले आहे.
...................
काही जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेची केंद्रे अधिग्रहित करण्यात आली आहेत, तसेच काही जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात येत असल्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता सोमवार, ९ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.