गारपिटीमुळे कोकणात हवापालट; आंबा, काजूपीक धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 04:43 PM2018-02-17T16:43:43+5:302018-02-17T16:44:52+5:30
मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे
रत्नागिरी : मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे. फेब्रुवारी निम्मा संपला तरी शेतकऱ्यांना फवारण्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. शिवाय आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे.
यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने सुरूवातीला किनारपट्टीलगतच्या बागायतींमध्ये मोहोर प्रक्रिया सुरू झाली. परंतु डिसेंबरमध्ये झालेल्या ओखी वादळानंतर मोहोर कुजला, फळे गळली. जानेवारीमध्ये परत मोहोर आला. दुबार मोहोर आल्यामुळे फळांची गळ झाल्याने कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला. हवामानातील बदलामुळे तुडतुडा, खार (बुरशीजन्य), थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला परागीकरणाअभावी फळधारणा अत्यल्प झाली. थंडीमुळे झाडावर ताण आला होता. परंतु उष्मा वाढल्यामुळे पुनर्मोहोर सुरू झाला. फळधारणा झाली असताना मोहोरामुळे पुन्हा एकदा फळगळ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. मोहोर व आंब्याच्या संरक्षणासाठी यावर्षी फवारणीचा खर्च अधिक झाला.
दोन वेळा फळधारणा होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. किमान सात ते आठ वेळा शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली आहे. एकाच झाडाला तीनवेळा मोहोर आला. या मोहोराला फळधारणा सुरू झाली आहे. फळधारणा झालेला आंबा मे मध्येच तयार होण्याची शक्यता आहे. सध्या कणी ते वाटाणा या आकारात फळधारणा झाली आहे. हा आंबा एकाच वेळी बाजारात आल्यास दर कोसळण्याची भीती आहे.
कीटकनाशकांचा दर वधारला
किमान तापमानामुळे तुडतुड्याचा प्रभाव वाढत आहे. तुडतुडा पूर्णपणे नष्ट होत नसल्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. बागायतदारांनी सुरूवातीपासून वेळोवेळी केलेल्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे. जीएसटीमुळे कीटकनाशकांचा दर वधारला आहे. लाकडी खोका (पिंजरा) मजुरीच्या दरात वाढ तसेच इंधनाचे सातत्याने वाढणारे दर विचारात घेता वाहतूक खर्च वाढल्यामुळे आंबापीक उत्पादन खर्चिक बनले आहे. मात्र, त्या तुलनेत आंब्याला हमीभाव मिळत नाही.
तुकाराम घवाळी, बागायतदार रत्नागिरी
मुंबई मार्केटमध्ये जाणारा आंबा अल्प
सध्या मुंबई मार्केटमध्ये आंबा पाठवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यातून आंबा पाठवण्यात येत असला तरी सर्वाधिक आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविला जात आहे. कोकणातून ३०० ते ४०० पेट्या दररोज पाठवण्यात येत असल्या तरी सिंंधुदुर्गमधील आंबा अधिक आहे. तीन हजार ते सहा हजार रूपये पेटीला दर मिळत आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यातील ओखी वादळातून वाचलेला आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे. परंतु याचे प्रमाण अल्प असल्यामुळे थोड्या दिवसानंतर याला ब्रेक मिळणार आहे.
गुढीपाडव्यानंतर आंबा बाजारात ?
दहा वर्षांपूर्वी शेतकरी गुढीपाडव्याला आंब्याची तोड करत असत, यावर्षीदेखील गुढीपाडव्यानंतरच आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादन घटले आहे. ढगाळ हवामानामुळे आंबा मोहोरावर करपा, भुरी, तुडतुड्याचा प्रभाव वाढत आहे. काजू पिकावर ढेकण्या (टी-मॉस्किटो) या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत.