साताऱ्याला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:58+5:302021-09-07T04:37:58+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. अर्चना ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. अर्चना वाघमळे यांनी जुलै २०१९मध्ये या पदाची सूत्रे हाती घेतली होती. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.
मागणीत घट
राजापूर : सध्या बाजारात माशांची आवक वाढली आहे. मात्र, श्रावण महिना सुरु असल्याने मागणी कमी असल्याचे चित्र राजापुरात आहे. नारळी पौर्णिमा होताच मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारीला परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर मच्छी बाजारात येत आहे. मात्र, श्रावणमास असल्याने खवय्यांनी मच्छी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
स्पर्धकांची बाजी
देवरूख : जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशनतर्फे ओ. पी. जिंदल जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत देवरुखमधील पाध्ये स्कूलच्या गुंजन आशिष खवळे हिने आठवी गटात प्रथम, आरोही राजेश सावंत हिने नववी गटात प्रथम, जिज्ञासा कमलाकर कनावजे हिने तिसरा क्रमांक तर श्रुती प्रवीण पाटील हिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले आहे.
पुस्तक भेट
राजापूर : तालुक्यातील जुवाठी येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र बालग्रंथालय निर्मिती उपक्रमासाठी ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या दीडशे प्रती देणगीदाखल मिळाल्या आहेत. ओणी येथील वासल्य मंदिरचे माजी विद्यार्थी व सध्या कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक संशोधक महेश कुमार यांनी १०० तर कोल्हापूर येथील अभिनंदन प्रकाशनचे मालक त्रिभुवननाथ जोशी यांनी ५० प्रती दिल्या आहेत.
वाहनचालकांची डोकेदुखी
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी असला तरी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील विविध भागामध्ये तसेच मुख्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. मात्र, अजून काही भागात व मुख्य रस्त्यावरील खड्डे भरणे गरजेचे आहे.