वैशिष्ट्यपूर्ण भात जाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:38+5:302021-05-06T04:33:38+5:30
चिकट भात भातातील अमायलोझ व अमायलोपेक्टिन या स्टार्चच्या प्रमाणावर त्याचा चिकटपणा ठरतो. अमायलोपेक्टिन जास्त असेल, तर भात अधिक चिकट ...
चिकट भात
भातातील अमायलोझ व अमायलोपेक्टिन या स्टार्चच्या प्रमाणावर त्याचा चिकटपणा ठरतो. अमायलोपेक्टिन जास्त असेल, तर भात अधिक चिकट होतो, अशा भाताला ‘ग्लुटिनस राईस’ असेही म्हटले जाते. विविध बिअर, पुडिंग, गाेड पदार्थ यांत त्याचा वापर होतो. अशा भात जातींचे उत्पादन फारच कमी असते; पण जास्त भावाने शेतकऱ्याचा तोटा भरून येऊ शकतो.
बुटिक किंवा सेंद्रिय भात
ज्या भातात सुगंधाबरोबर चिकटपणाही असतो. अशा भाताला बुटिका राईस म्हणतात. थायलंड व कंबोडियामध्ये असा भात विशेष लोकप्रिय आहे. चीनमध्ये यावर मोठे संशोधन सुरू असून, हेक्टरी साडेसात टनांपर्यंत उत्पादन मिळणाऱ्या जाती त्यांनी विकसित केल्या आहेत. अशा जातींची लागवड विशेषत: निर्यातीसाठी केली जाते. याशिवाय सेंद्रिय भाताकडे ग्राहक व शेतकरी वळत असून वैशिष्ट्यपूर्ण भातात त्याचाही समावेश होताे आहे.
दुर्मीळ जाती
कोकणात सोनपळ, तांबडी पटणी या दोन स्थानिक जाती लाल तांदळासाठी घेतल्या जातात. आता त्या फारच दुर्मीळ होत आहेत. स्थानिक लोक लहान मुलांसाठी पाैष्टिक म्हणून किंवा मऊ पातळ भात न्याहारीसाठी खाण्याची पद्धत आहे. मांसाहारी लोक तर मटणाबरोबर हा भात आवर्जून खातात. चांगली चव, आकर्षक रंग व चिकटपणामुळे खवय्यांना जास्त भावाने खरेदी करायला काही वाटत नाही. सध्या नव्या जातीमुळे हा तांदूळ मागे पडत असला, तरीही त्यावर संशोधन झाले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
उत्पादन कमी
संशोधनाने नव्या जातींचे उत्पादन जास्त मिळू लागले. पारंपरिक जाती उंच वाढणाऱ्या, तयार झाल्यावर लोळणाऱ्या व कमी उत्पादकतेच्या आहेत. या जाती खतांना प्रतिसाद देत नाहीत. नव्या जाती बुटक्या, ताठ, भरपूर उत्पादन देणाऱ्या आहेत. रंगीत सुगंधी जातीमध्ये या गुणधर्मासह भरडणीवेळी तांदूळ न तुटणे, रंग कमी न होण्याची काळजी घ्यावी लागेल.
कीडरोगांचा धोका
भाताच्या नवीन जातींवर काम करताना त्यामध्ये कीड-रोग प्रतिकारकता आणणे आवश्यक आहे. भाताचा जनुकीय नकाशा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे रेण्वीय स्तरावर (मोलेक्युलर लेव्हल) काम करून या सर्व समस्या दूर करता येतील. या जातींच्या संशोधनात दुर्लक्ष असल्याने या जाती फायदेशीर नाहीत.
समस्या
बासमती व नव्या पुसा सुगंधाचे काही प्रकार वगळता अन्य जातींच्या संशोधन क्षेत्रात पर्दापण झालेले नाही. त्यामुळे नव्या जाती अनेक बाबतींत सरस ठरतात. महत्त्वाचे म्हणजे या जातींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविले, कष्ट कमी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्पेशालिटी राईसचे महत्त्व चर्चिले जात असताना, विद्यापीठांना हा विषय संशोधनासाठी घ्यावा लागेल.