कोरोनाबाधित कामगारांना आश्रय, तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:05 PM2020-06-22T15:05:46+5:302020-06-22T15:08:53+5:30
कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़
रत्नागिरी : कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़
जयगड येथील आंग्रे पोर्टमध्ये दोन जहाजे दुरुस्तीच्या कामासाठी दाखल झाली होती़ या जहाजांवर एकूण १३ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती़ चाचणीनंतर त्यापैकी ३ जण गणपतीपुळ्यातील हॉटेल अभिषेक, २ जण हॉटेल विसावा आणि ८ जण हॉटेल एकदंतमध्ये राहिले होते़ या लोकांची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाला देण्याची आवश्यकता होती़ मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून दडवून ठेवली होती़
हॉटेल अभिषेकमध्ये ठेवण्यात आलेले लोक गणपतीपुळे बाजारपेठेमध्ये फिरले होते़ त्यांनी बाजारपेठेतील एका केशकर्तनालयात जाऊन केसही कापले होते़ दरम्यान, या १३ जणांपैकी ३ जणांच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या परिसरात खळबळ उडाली होती़ दरम्यान, लोकांमध्ये हॉटेल व्यावसायिकांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता़ त्याचबरोबर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव व अन्य तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती़
दरम्यान, जयगड, गणपतीपुळे परिसरातील लोकांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे़ कामगारांची माहिती दडविल्याप्रकरणी हॉटेल अभिषेकचे मालक प्रसाद त्र्यंबकेश्वर तोडलकर, हॉटेल एकदंतचे मालक प्रसाद कृष्णा बेलगांवकर, हॉटेल विसावाचे मालक राजेश श्रीधर केदारी आणि सलून व्यावसायिक हलीम गुलामनबी शेख या चार जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़