गुहागरात अष्टविनायक एनर्जीविरुद्ध दोषारोपपत्र
By admin | Published: July 16, 2014 11:03 PM2014-07-16T23:03:16+5:302014-07-16T23:05:08+5:30
सुशिक्षित नोकरदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या
गुहागर : कमोडिटी मार्केटिंगच्या माध्यमातून गुहागरातील सुशिक्षित नोकरदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या श्री अष्टविनायक एनर्जी अँड मेटल कंपनीच्या प्रभाकर चंद्रप्पा चौगुले, प्रदीपकुमार पांडुरंग पतंगे व त्यांना सहाय करणाऱ्या गुहागरमधील विश्वास शंकर माने यांच्याविरोधात गुहागर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कोल्हापुरातील श्री अष्टविनायक कंपनीकडून कमोडिटी मार्केटिंगच्या नावाखाली करोडो रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. कंपनीचा सूत्रधार प्रदीपकुमार पतंगे याच्यावर विविध गुन्हे दाखल करुन कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. प्रभाकर चौगुले व प्रदीपकुमार पतंगे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केल्याने या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुहागर येथील अनेकांचे धाबे दणाणले. गुहागर विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास शंकर माने यांच्या मध्यस्थीने प्रभाकर चौगुले याने गुहागर येथेही शिक्षकांना कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले.
यानंतर अण्णासाहेब पाटील, विलास पांडुरंग कोकरे यांनी आपल्या फसवणुकीबाबत पोलिसांकडे कैफियत मांडली. यानुसार ६० लाख ४० हजार रुपये इतकी फसवणूक झाल्याची नोंद झाली.
असे असले तरी अनेक शिक्षक व ग्रामस्थांनी लाखो रुपये यामध्ये गुंतवले होते. मात्र, बदनामी टाळण्यासाठी व पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनेकांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले.
याबाबत गुहागर पोलिसांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केल्यानंतर १४ जुलैला गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. लवकरच याप्रकरणी खटल्याला आता सुरूवात होणार आहे. (प्रतिनिधी)