धबधब्याचे आकर्षण सुटेना; लाॅकडाऊन काही उठेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:36+5:302021-07-04T04:21:36+5:30
रत्नागिरी : कोकणातील धबधबे हे बाहेरच्या पर्यटकांचेच नव्हे तर स्थानिकांचेही आकर्षण आहे. काही दिवस पाऊस झाला की, धबधबे उंच ...
रत्नागिरी : कोकणातील धबधबे हे बाहेरच्या पर्यटकांचेच नव्हे तर स्थानिकांचेही आकर्षण आहे. काही दिवस पाऊस झाला की, धबधबे उंच कड्यांवरून कोसळू लागतात. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. सध्या पाऊस सुरू असल्याने काही धबधबे कोसळू लागले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अशा सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध आणल्याने अनेक उत्साही व्यक्तींना मोह आवरावा लागत आहे.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबर मौजमजेचे ठिकाण असतात. सुटीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी होते. पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांना विशेष प्राधान्य दिले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील अशा धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. पर्यटक अगदी कुटुंबासमवेत धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
जिल्ह्यात उक्षी, निवळी, रानपाट (रत्नागिरी), मालघर, सवतकडा (चिपळूण) आदी धबधब्यांवर पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली, रत्नागिरीतील पानवळ धरण आदी ठिकाणीही धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आता हे धबधबे प्रवाहित होऊ लागले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर केले असून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्याने, बागा आदी मनोरंजनाच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता धबधबे भरून वाहू लागले, तरीही लाॅकडाऊनमुळे धबधब्यांचा आनंद घेता येणार नाही.
सध्या पाऊस सुरू झाल्याने अनेकांना अशा ठिकाणांचा मोह होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची पावले धबधबे किनाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. मात्र, लाॅकडाऊन असल्याने अशा ठिकाणांचा मोह आवरावा लागत आहे. काही मनमानी करून अशा ठिकाणी जातात. परंतु, पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यटनहौशी सध्या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा, किनाऱ्यांचा आनंद घेण्यास उत्सुक असले, तरीही जिल्हा प्रशासनाचे निर्बंध उठेपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.