वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:36+5:302021-06-19T04:21:36+5:30
लाल मातीत पिके घेण्यात येत असली तरी तेल काढणे मात्र खर्चिकच मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : दीपावलीच्या ...
लाल मातीत पिके घेण्यात येत असली तरी तेल काढणे मात्र खर्चिकच
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दीपावलीच्या सणापासून खाद्यतेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एक लिटरच्या पिशवीसाठी १९८ रुपये मोजावे लागत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून तेलाच्या दरात झालेली घट ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. लिटरमागे १० ते १५ रुपये कमी झाले आहेत.
गेल्या आठ महिन्यांत तेलाचे दर प्रचंड कडाडले होते. परदेशातून रिफाइंड तेल आयात होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच तेलाचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे किरकोळ, तसेच घाऊक विक्रीच्या दरात वाढ झाली होती. तेलाच्या दरातील घसरण नक्कीच ग्राहकांसाठी फायदेशीर असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.
कोकणात भुईमूग, सूर्यफुलाची शेती शेतकरी करीत असले तरी त्यापासून तेल तयार करणारी मंडळी मोजकीच आहे. जिल्ह्यात तेलाच्या घाण्यांची कमतरता हेही महत्त्वपूर्ण कारण आहे. सोयाबीनची शेती कोकणात केली जात नाही. त्यामुळे सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा, पाम तेलाची जिल्ह्यात प्रामुख्याने विक्री केली जाते. शेंगदाणा तेलापेक्षा सूर्यफूल, सोयाबीन तेलासाठी विशेषत: मागणी होत आहे. दर वाढल्यापासून तेलाच्या मागणीवर परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, आता दर कमी झाले असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणच्या लाल मातीत शेंगदाणा पीक घेण्यात येत आहे. चांगल्या दर्जाचा शेंगदाणा तयार होतो. मात्र, आपल्या जिल्ह्यात शेंगदाण्यापासून तेल काढणारे घाणे मोजकेच आहेत. त्यामुळे लगतच्या जिल्ह्यात जाऊनच तेल काढून आणावे लागते. लगेचच तेल काढून मिळणे शक्य नाही, शिवाय खर्चिक बाब असल्याने तेल काढण्यापेक्षा शेंगदाणा विकून तेल विकत आणत आहे. तेलाचे दर प्रचंड वाढलेले असल्याने शेंगदाणा विकून येणाऱ्या पैशात आणखी पैसे घालून तेल खरेदी करावे लागत आहे.
-विक्रम राऊत, शेतकरी
शेंगदाण्यासह सूर्यफुलाची शेती करतो. मात्र, त्यापासून तेल तयार करण्यासाठी अन्य जिल्ह्यांत जावे लागते. त्यापेक्षा कामानिमित्त अन्य जिल्ह्यांत जातो तेव्हा शेंगदाणा व सूर्यफुलाच्या बियांची विक्री करतो व येणाऱ्या पैशातून तेल खरेदी करतो. गेल्या काही महिन्यांत तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तेलासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहेत. तेलाच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. सध्या खाली आलेले दर आणखी कमी होणे अपेक्षित आहे.
-अमित जाधव, शेतकरी
गृहिणींचे बजेट काेलमडले
गेल्या आठवड्यापासून दहा ते पंधरा रुपयांनी तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेलातील घसरण एवढ्यावरच न थांबता आणखी होणे गरजेचे आहे, तरच सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल. अद्याप तरी तेल १३० ते १८५ रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेलेच असून, फोडणी देताना प्रश्न निर्माण होत आहे.