नोकरीच्या आमिषाने २२ तरुणांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:20 PM2021-02-12T13:20:48+5:302021-02-12T13:22:38+5:30
Crimenews Police Chiplun Ratnagiri- नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण : नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार खेर्डी येथील संजय रामभाऊ चव्हाण याने श्री स्वामी समर्थ असोसिएशन नावाने एक कंपनी सुरू केली. तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या गंभीर आहे, हे ओळखून २५ ते ४० वयोगटातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली. एकाने ५ सदस्य जोडले, तर त्याला ५ ते २५ हजार इतके मानधन मिळेल, असे नवीन आमीष दाखविले.
कैलास मारुती मालुसरे (रा. गोंधळे) यांनी तर तब्बल १६३ आयडी घेतले आणि चक्क १ लाख ८१ हजार ५०० रुपये या स्कीममध्ये गुंतवले. मालुसरे यांच्यासह २२ जणांची २३ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संजय चव्हाणवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण तपास करत आहेत.
बक्कळ पैसा देण्याचे आमीष असलेली योजना
डिसेंबर महिन्यात श्री स्वामी समर्थ असोसिएशनच्या माध्यमातून त्याने नवीन स्कीम लाँच केली. ५०० रुपये भरून एक ऑनलाईन आयडी घेतल्यानंतर १६० रुपये कमिशन मिळणार, अशी ती योजना होती. बक्कळ पैसा मिळणार म्हणून अनेकजण या स्कीमकडे आकर्षित झाले. अनेकांनी यात आपल्याकडील लाखो रूपये गुंतवले.