आवाशीत महामार्गावर रासायनिक सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:11 PM2020-11-20T19:11:16+5:302020-11-20T19:14:09+5:30
अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे.
आवाशी : अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आवाशी येथे असणाऱ्या पेट्रोलपंपाच्या पुढे गेले दोन दिवस अज्ञात वाहनाच्या मदतीने लोटे औद्योगिक वसाहतीत कंपनीचे रासायनिक सांडपाणी महामार्गालगतच नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार गावातील अमित आंब्रे व त्याच्या सहकाऱ्यांच्या नजरेस आला. या घटनेची माहिती अमित अशोक आंब्रे यांनी एमपीसीबीला दिली. त्यानुसार बुधवारी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार त्याच ठिकाणी घडला आहे.
रासायनिक सांडपाणी हे निळ्या व हिरव्या रंगाचे असल्याने रंग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर स्थानिकांतून संशय व्यक्त केला जात आहे. एमपीसीबीने घटनास्थळी भेट देऊन कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार देण्याचे तरुणांना आवाहन केले. त्यानुसार अमित आंब्रे यांनी एमपीसीबीला लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. हे गैरकृत्य करणाऱ्याचा शोध घेऊन संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी मात्र याबाबत संपर्क होऊ शकला नाही.