नगराध्यक्ष स्वकियांच्याच चक्रव्युहात चितपट
By admin | Published: December 14, 2014 10:10 PM2014-12-14T22:10:05+5:302014-12-14T23:49:30+5:30
रत्नागिरी पालिका : एलईडी दिव्यांसह गाळ्यांच्या दुरुस्ती प्रश्नावर घरचा आहेर...
रत्नागिरी : रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा राजकीय चक्रव्यूह नाट्यमयरित्या भेदून नगराध्यक्षपदाची खूर्ची महेंद्र मयेकर यांनी पटकावली. मात्र, आता या चक्रव्युहातच त्यांना कोंडण्याची, चितपट करण्याची किमया स्वकियांसह विरोधकांनीही साधल्याचे नगरपरिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत दिसून आले. हा चक्रव्यूह भेदून सहीसलामत बाहेर पडण्यात मयेकर यशस्वी होणार की नाही, याबाबत रत्नागिरीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शुक्रवारी (१२ डिसेंबर २०१४) रत्नागिरी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली. ही सभा अपेक्षेप्रमाणेच गाजली. सभेत एलइडी दिवे, गाळ्यांची दुरुस्ती यांसारख्या विषयांवरून विरोधकांबरोबर सत्तेतील स्वकियांनीच महेंद्र मयेकर यांच्यावर तुटून पडत त्यांना ठरावावर मतदान घेण्यास भाग पाडले व त्यांनीच मांडलेला ठराव फेटाळून लावला. यापुढे असे प्रकार सभागृहात वारंवार होणार आहेत.
परिणामी मयेकर यांना विकासाची कोणतीही कामे मंजूर करून घेताना अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे, अल्पमतात यावे लागणार आहे. त्यामुळे कामे पुढे जाणारच नाहीत. ही सातत्याने होणारी कोंडी त्यांना फोडावी लागेल.
तांत्रिकदृष्ट्या नगराध्यक्षपदावरून त्यांना हटविणे शक्य नसले तरी कारभार हाकताना त्यांची या चक्रव्युहात सातत्याने कोंडी होणार आहे. त्यामुळे हा चक्रव्यूह भेदून ते सहीसलामत बाहेर निघणार की, केवळ शोभेचे नगराध्यक्ष म्हणून कारभार करणार, याबाबत रत्नागिरीकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणूक काळात केवळ तीन महिन्यांसाठी भाजपाला नगराध्यक्षपद देण्याचे युतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने मान्य केले.
त्यानंतरच्या नाट्यमय घटनाक्रमात महेंद्र मयेकर यांनी भाजपातच आपल्यासह ६ नगरसेकवकांचा स्वतंत्र गट तयार केला. त्यामुळे पुन्हा नगराध्यक्ष होण्याची अशोक मयेकर यांची संधी हुकली होती. परंतु दिलेला शब्द सेनेने पाळला. युतीचे नगराध्यक्ष म्हणून अशोक मयेकर यांच्याऐवजी महेंद्र मयेकर यांना भाजपानेच पक्षात ऐक्य राखण्यासाठी संधी दिल्याने सेनेने मयेकर यांच्या पारड्यात मते टाकली. मयेकर निवडून आले. मात्र, त्यानंतर तीन महिन्यांचा काळ उलटूनही त्यांनी नगराध्यक्षपद सोडले नाही. त्यामुळे शिवसेना त्यांच्या पूर्ण विरोधात गेली आहे.
कारभारात कोणतेही सहकार्य न करण्याचा सेनेने जणू विडाच उचलला आहे. तर त्यांच्यासोबत भाजपांतर्गत नगरसेवकही पुढे सरसावले असून, मागचे हिशेब पूर्ण करण्यात गुंतले आहेत. (प्रतिनिधी)
ते वक्तव्य सेनेच्या जिव्हारी...
तीन महिन्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सेनेला दिलेला शब्द पाळणार काय, या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर नगराध्यक्ष मयेकर यांनी आक्रमक उत्तर दिले होते. आपल्याकडे सत्तेचे प्रिपेड नव्हे; तर पोस्टपेड सीमकार्ड आहे. ज्यांचे प्रिपेड कार्ड आहे ते पदावरून पायउतार होतील. आपण पूर्णत: २०१७ पर्यंत नगराध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण करणार असे ठासून सांगितले होते. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी वार झाल्याचे त्यांच्या काही नगरसेवकांत बोलले जात आहे. परिणामी जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार सेनेने केला आहे.
सेना करणार जशास तसे...
पद न सोडल्याने रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनाही बनली आक्रमक.
मयेकरांना सातत्याने द्यावी लागणार अग्निपरीक्षा.