मुख्य आरोपी महेश नवाथे अटकेत

By Admin | Published: November 15, 2016 11:20 PM2016-11-15T23:20:35+5:302016-11-15T23:20:35+5:30

१४ कोटींचे फसवणूक प्रकरण : पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

Chief accused Mahesh Nawathe detained | मुख्य आरोपी महेश नवाथे अटकेत

मुख्य आरोपी महेश नवाथे अटकेत

googlenewsNext

रत्नागिरी : जागा तसेच फ्लॅटचे आमीष दाखवून ३४० जणांची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी महेश गोविंद नवाथे याला कल्याण-डोंबिवली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात आणखी १४ जणांचा समावेश आहे. ही फसवणूक युटोपिया आयडियल सीटी नावाच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट सीटी प्रकल्पाच्या नावाखाली करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे-निवेंडी येथे रत्नागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चा संचालक महेश नवाथे याने युटोपिया आयडियल सीटी नावाचा एक अत्याधुनिक प्रकल्प करण्याचे नियोजन केले होते. या कंपनीने आधुनिक पद्धतीने जाहिरात करून ग्राहक मिळविले. प्रत्येक ग्राहकाकडून सुमारे चार ते पाच लाख रुपये आगाऊ पैसे घेण्यात आले. त्याच्या पावत्या देण्यात आल्या. त्याचबरोबर संबंधित ग्राहकांना दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा देता न आल्यास गुंतविलेली रक्कम १५ टक्के व्याजदराने परत करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. या प्रकरणात ३४० ग्राहकांकडून सुमारे १४ कोटी २८ लाख २३ हजार ८२० रुपये महेश नवाथे याने घेतले असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.
ग्राहकांना मुदतीत फ्लॅट न मिळाल्यामुळे ३४० गुंतवणूकदारांपैकी ५७ ग्राहकांनी याची फिर्याद चार महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. या ग्राहकांची सुमारे दोन कोटी ७० लाखांची फसवणूक झाली होती. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम निवेदिता नवाथे, शांताराम शिवराम ठाकूरदेसाई, अनिल अजित गांधी व किरण प्रकाश राहटे यांना ताब्यात घेतले होते, परंतु त्यातील मुख्य संशयित आरोपी महेश नवाथे फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध युद्धपातळीवर घेत होते. अखेर मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा करत पोलिसांनी महेश नवाथे याला कल्याण-डोंबिवली येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी १४ जणांचा समावेश असल्याचीही माहिती प्रणय अशोक यांनी दिली. (वार्ताहर)
 

Web Title: Chief accused Mahesh Nawathe detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.