प्रभारी मुख्याधिकारी ‘लय भारी?’
By admin | Published: July 17, 2014 11:44 PM2014-07-17T23:44:51+5:302014-07-17T23:52:18+5:30
सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे या पालिकेतील सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याआधी नियमित मुख्याधिकारी व गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारी असताना सातत्याने त्यांच्या कारभाराविरोधात ओरड करणाऱ्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी नियमांवर बोट ठेवत आपल्या पदाचा हिसका दाखविल्याने सत्ताधारी हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाली असून, त्यांना तत्काळ बदलावे, असे निवेदन युतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याआधीही अशी तक्रार देण्यात आली होती. मात्र, कारवाई काहीच झाली नव्हती.
तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. मुख्याधिकारीपदी एम. बी. खोडके असताना सत्ताधारी व प्रशासन या सर्वांनाच सांभाळून घेत कारभार सुरू होता. मात्र, त्या काळातही रत्नागिरीच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा येण्याचे गगे यांचे प्रयत्न सुरू होते. पालिकेतील जाणता राजा व जुना कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यालाही गगे यांचे रत्नागिरी पालिकेत पुनरागमन व्हावे, असेच वाटत होते. परंतु त्यांची नियुक्ती राजापूर पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून झाली.
मुख्याधिकारी खोडके यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर रत्नागिरी पालिकेला तात्पुरता कार्यभार पाहणारे अनेक मुख्याधिकारी मिळाले. त्यानंतर हा कार्यभार राजापूरच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम करताना व आता प्रभारी म्हणून काम करताना त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे सत्ताधाऱ्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे पालिकेतील सध्याचे महायुतीचे पदाधिकारीही त्यांच्या विरोधात आहेत.
आता प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहतानाही त्यांनी रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासह अनेक बाबतीत शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करीत सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ठेंगा दाखवला. पालकमंत्र्यांच्या आडून कारभार पाहतात, असा आरोपही गगे यांच्यावर झाला आहे.
आता पुन्हा अनेक विकासकामांवरून महायुती व मुख्याधिकारी यांच्यात जोरदार वाद सुरू असून, त्यातूनच गगे यांची तत्काळ बदली करून पालिकेला नियमित मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मॅडमपुढे काही चालेना!
३० वर्षांपासून पालिकेच्या मारुती मंदिर येथील व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत असल्याने या गाळ्यांना सील ठोकण्यात आले. पूर्ण थकबाकी दिल्याशिवाय हे गाळे संबंधितांच्या ताब्यात देऊ नयेत, असा ठरावही महायुतीने सर्वसाधारण बैठकीत केला. ३० वर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांना दया दाखवणे चुकीचे आहे, अशी महायुतीची भूमिका असतानाही मुख्याधिकारी गगे यांनी पुन्हा आपलाच वरचष्मा दाखवत २५ टक्के रक्कम स्वीकारून थकबाकीदारांना गाळ्यांचा ताबा दिला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत प्रचंड संताप आहे. नागरिकांतही रोष आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचे मॅडमपुढे काही चालेना, अशी स्थिती आहे.