वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्य अभियंते ‘फिल्ड’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:36+5:302021-07-26T04:28:36+5:30
रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा ...
रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करावा लागला होता. चिपळूण येथे वीज पुरवठा करणाऱ्या तीन उपकेंद्रांतून १६ वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा देण्यात येतो. यापैकी एका उपकेंद्रात पूर परिस्थितीला उतार आल्यानंतर चार फिडरद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर व महावितरणची सर्व टीम त्यासाठी धडपडत आहे.
चिपळूण शहर व परिसरातील ३६ गावात पूर आला होता. त्यापैकी पाच गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १,१३५ ट्रान्सफॉर्मरपैकी केवळ ३४६ ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात येऊन ५०,९७५ वीज जोडण्यांपैकी १६,३०३ वीज जोडण्या पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.
अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वीज मीटर, ट्रान्सफॉर्मर चिखल आणि गाळाने भरून गेले आहेत. याठिकाणी वीज प्रवाह धोकादायक ठरू शकतो, यासाठी खबरदारी घेण्यात येत असतानाच वीज पुरवठा सुरू केलेला नाही. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर हे स्वत: चिपळूण येथे पूरस्थळी कार्यरत झाले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन्ही उपकेंद्र सुरू करणे, उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करणे याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत आहे.
चिपळूण येथील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधन सामुग्री तातडीने उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा कोकण प्रादेशिक कार्यालय येथील प्रभारी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे घेत आहेत. चिपळूण तसेच पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत पुरवठा लवकरच पूर्वपदावर येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.