मुख्यमंत्र्यांनी कोकण भेटीत टाळला नाणारचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:23 AM2020-02-18T02:23:33+5:302020-02-18T02:24:01+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.
रत्नागिरी : गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित सभेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुचर्चित नाणार प्रकल्पाचा उल्लेखही केला नाही. नाणारच नाही तर कोकणातील कोणत्याही प्रकल्पाबाबत त्यांनी गणपतीपुळे येथील कार्यक्रमावेळी काहीच भूमिका मांडली नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आयलॉग प्रकल्पासह नाणार प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचा मुद्दा प्रकल्प परिसरातील शिवसेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थ गेले काही दिवस पोटतिडकीने मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यावर काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेने नरमाईची भूमिका तर घेतली नाही ना, असा कोकणवासियांचा अंदाज आहे. गणपतीपुळे येथील कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी रस्त्यांसाठी २00 कोटी तर साकवांसाठी १00 कोटी रूपयांची मागणी केली.
भास्कर जाधव यांचे
नाराजी नाट्य
गणपतीपुळे येथे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे नाराजी नाट्य समोर आले. मुख्यमंत्री व्यासपीठावर आले तेव्हा जाधव मात्र लांबच्या खुर्चीत बसले होते. खासदार विनायक राऊत यांनी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव यांनी त्यांचा हात झटकला. मंत्रिपद न मिळाल्यानेच जाधव यांची ही नाराजी आहे का, अशी चर्चा होती.