रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या हक्काची, उदय सामंत यांनी व्यक्त केलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:34 AM2023-10-07T11:34:40+5:302023-10-07T11:35:18+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, ...
रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील, असे मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मंत्री उदय सामंत शुक्रवारी (दि.६) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपले मोठे बंधू किरण सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा असून, आग्रहही आहे. त्यांनी लोकसभेत जावे, असे मलाही वाटत आहे. परंतु, निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत, त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली तर तीही शिवसेनेमधूनच असेल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी या मतदारसंघावर दावा केला तरी शिंदे - फडणवीस - पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल
नांदेड दुर्घटनेचे समर्थन करता येणार नाही. या प्रकारानंतर आपण तातडीने रत्नागिरी व रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून भेटी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, असे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघेल, असे मंत्री सामंत म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे घरात बसून काम करत नाहीत
मुख्यमंत्री शिंदे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आहे. ते घरात बसू काम करत नाहीत किंवा कोणतेही आदेश फेसबुक लाइव्ह करीत नसल्याचा टोला मंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. शिंदे व ४० आमदारांवर गद्दार व खोके घेतल्याचा आरोप केला जातो, मग उद्धव ठाकरेंनी आता अजितदादा गद्दार आहेत, की खोके घेतले तेही एकदा जाहीर करावे, असे आव्हानही दिले.