मुख्यमंत्री आज जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 11:51 PM2016-01-16T23:51:54+5:302016-01-16T23:51:54+5:30
रत्नागिरीत पहिलाच दौरा : भाजपकडून स्वागताची जंगी तयारी
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात कोकणासाठी लाभदायक ठरणाऱ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता हे देखील येणार आहेत.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. आज, रविवारी खेड तालुक्यातील महाळुंगे येथे सकाळी साडेनऊ वाजता जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगबुडी नदीवरील जलोपासना अभियानाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान, जलबिरादरी महाराष्ट्र आणि सिंधुरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने संबंध कोकणात हा जलपरिक्रमेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जलक्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि मेगॅसेसे पुरस्कार प्राप्त डॉ़ राजेंद्रसिंह, पालकमंत्री रवींद्र वायकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
खेड, चिपळूण येथील कार्यक्रम आटोपून ते दुपारी रत्नागिरीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. चिपळूणहून ते हेलिकॉप्टरने दुपारी पावणेदोन वाजता रत्नागिरी विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता शहरातील माळनाका येथील मराठा मैदानावर होणाऱ्या शामराव पेजे जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
यानंतर ते रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन स्वागत कक्षाची पाहणी करणार आहेत. त्याचवेळी ते शहर पोलिसांच्या अॅपचे उद्घाटनही करणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, दत्ता देसाई यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. (शहर वार्ताहर)