मंगळसूत्र गहाण ठेवून मुलाला पाठविले स्पर्धेला

By admin | Published: June 7, 2015 11:51 PM2015-06-07T23:51:33+5:302015-06-08T00:47:37+5:30

वेगळा आदर्श : खेड तालुक्यातील केळणे गावच्या कदम दाम्पत्याचे औदार्य

The child sent a pledge to the Mangalsutra and presented it to the contest | मंगळसूत्र गहाण ठेवून मुलाला पाठविले स्पर्धेला

मंगळसूत्र गहाण ठेवून मुलाला पाठविले स्पर्धेला

Next

कुंभाड : कौटुंबिक पातळीवर आर्थिक ओढाताण होत असताना आई-वडिलांची दमछाक पाहायला मिळते. मात्र, याला छेद देण्याचे काम मयुरी महेश कदम व महेश कदम या दाम्पत्याने केले आहे.
खेड तालुक्याच्या केळणे गावातील या दाम्पत्याने मुलाच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवले आहे. अनेकांनी मदत झिडकारल्यानंतर उभयतांनी संग्रामला गोवा येथे पाठविले. तेथे संग्रामने अभूतपूर्व कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले व त्यागाची पोचपावती दिली. केळणे गावातील कदम कुटुंबामध्ये घडलेल्या या ममतापूर्ण घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मयुरी महेश कदम यांचा मुलगा संग्राम कदम हा अत्यंत हुशार म्हणून परिचित आहे. त्याची किक बॉक्सिंगसाठी गोवा येथे खेळण्यासाठी निवड झाली होती. मात्र, क्रीडा साहित्य आणि इतर खर्चाकरिता लाखभर रूपये खर्च येणार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हा खर्च करणे शक्य नव्हते. मात्र, मुलाची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळासाठी झालेली निवड महत्त्वाची होती. शासकीय मदत मिळणे दुरापास्त बनले असताना पैशाअभावी आपला मुलगा स्पर्धेला मुकण्याची चिंता उभयतांना सतावत होती. मात्र, त्यांनी धीर सोडला नाही. यातूनही मार्ग काढत अखेरचा पर्याय म्हणून मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा निर्णय उभयतांनी घेतला. ‘मंगळसूत्र’ गहाण ठेवून त्या पैशातून मुलाला स्पर्धेसाठी रवाना केले. लेकरानेही या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आईची धडपड सार्थ ठरवली. संग्रामने पाचवीपर्यंतचे शिक्षण खेड तालुक्यातील आवाशी - देऊळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक शाळेत घेतले. पुढे एल. पी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावी पूर्ण केली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कमांडो ट्रेनिंग स्कूल इंडिया शाखा, वाई संचलित महर्षी शिंदे विद्यामंदिर, वाई येथे सातवीत प्रवेश घेतला.
यादरम्यान विद्यालयाचे प्रशिक्षक कॅप्टन एम. बी. खंकाळ, कमांडो एस. पी. जावळे, ए. एस. कल्याणकर यांनी किक बॉक्सिंग प्रकारात संग्रामची आवड लक्षात घेत त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली़ संग्रामनेही काटेकोरपणे पालन करत केवळ सहा महिन्यांत राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, तर राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावून प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला.
१६ ते १७ वयोगटातील २८व्या ज्युनिअर राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत खडतर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करुन पटकावलेले सुवर्णपदक व प्रमाणपत्र भारतीय शालेय क्रीडा महासंघ व भारतीय आॅलिंपिक महासंघाचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी यांच्या हस्ते स्विकारले. संग्रामची आता सिंगापूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याकरिता त्याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. सामाजिक संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संग्रामला आर्थिक सहकार्य करुन त्याच्या जिद्दीला बळ देण्याची गरज आहे. खेड तालुक्यातील केळणे गावच्या या विद्यार्थ्यांने स्पर्धेत घेतलेली गगन भरारी गाजत आहे. मात्र आता त्याची परीक्षा सिंगापूर येथील स्पर्धेत होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The child sent a pledge to the Mangalsutra and presented it to the contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.