जुन्या पुस्तकांवर मुले करत आहेत अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:15+5:302021-07-14T04:36:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.
एप्रिलमध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने मुलांना सरसकट पास करण्यात आले. त्याचवेळी गतवर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून संकलित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके संकलित केली होती.
शाळा दि.१५ जुलैपासून सुरू झाल्या असल्या तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, अध्यापन करताना मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे मुले जुनीच पुस्तके वापरत आहेत. शाळेच्या सूचनेचे पालन करत पालकांनी दिलेल्या शंभर टक्के प्रतिसादामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. पहिली ते आठवीच्या ऊर्दू माध्यम व मराठी माध्यमाच्या १ ते ५ वर्गांना स्वाध्याय पुस्तिका दिल्या आहेत.
n जुन्या पुस्तकांचे संकलन करून शिक्षकांनी केले वितरण
n पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमातील मुलांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध
n पहिली ते आठवीपर्यत ऊर्दू माध्यमांच्या मुलांना स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण
n सहावी ते आठवीपर्यंत मराठी माध्यमांच्या मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिकांचे काम सुरू.
दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके दिली जातात. गेल्यावर्षी शाळा भरल्या नव्हत्या परंतु नवीन पुस्तके मिळाली होती. त्यामुळे गुरुजींनी दिलेल्या जुन्या पुस्तकांवरच अभ्यास करत आहोत.
- सीया माेरे, विद्यार्थिनी, लांजा
गेल्यावर्षी परीक्षा झाल्याच नाहीत, परंतु पुस्तके सरांनी शाळेत जमा करून घेतली. शाळा सुरू होण्यापूर्वी सरांनी पुस्तके पाठवून दिली. मात्र, जुनीच पुस्तके आहेत. नवीन पुस्तके प्राप्त झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
- दुर्वेश बागकर, विद्यार्थी, रत्नागिरी
‘बालभारती’कडे एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. नवीन पुस्तके प्राप्त होताच विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र, तोपर्यंत मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी जुनी पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.
- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.